* रेल्वेकडून जागेचा शोध सुरू
* झोपडय़ांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
* अतिक्रमणांमुळे जागेची वानवा
ठाणे-वाशी-पनवेल या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर दिघा आणि बोनकोडे येथे नवी स्थानके उभारण्याविषयी रेल्वेने सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली असली, तरी दिघा रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी जागा कोठून मिळवायची, असा नवा तिढा रेल्वे तसेच सिडकोपुढे उभा ठाकला आहे. नवी मुंबईतील रेल्वे प्रकल्पांची उभारणी करताना होणाऱ्या खर्चापैकी सिडकोने ६७, तर रेल्वेने ३३ टक्के खर्च उचलायचा, असे धोरण यापूर्वीच ठरले आहे. दिघा, बोनकोडे स्थानकांच्या उभारणीकरिता हे प्रमाण ५०-५० टक्के असे ठेवायचे, असे निश्चित होत आहे. असे असले तरी दिघा स्थानकाची उभारणी करताना जागेच्या उपलब्धतेकरिता ऐरोली-दिघा परिसरातील हजारो झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा ठाकणार आहे. त्यामुळे या प्रकल्पास तत्त्वत: मान्यता देण्यापूर्वी पुनर्वसनाचा हा तिढा कसा सोडवायचा, असा प्रश्न रेल्वे तसेच सिडकोपुढे उभा ठाकला आहे.
ठाणे- तुर्भे- वाशी तसेच ठाणे- तुर्भे- नेरुळ अशा दोन नव्या रेल्वे मार्गाची उभारणी करून सिडको आणि रेल्वेने नवी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवेचे एक वर्तुळ यापूर्वीच पूर्ण केले आहे. या मार्गाचा विस्तार पुढे पनवेलपर्यंत केल्याने प्रवाशांनाही रेल्वे वाहतुकीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. नवी मुंबईतील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये बडय़ा शिक्षण संस्थांचे जाळे विणले गेले आहे. त्यामुळे या उपनगरांमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येत असतात. याशिवाय ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार वर्गासाठीही ठाणे-तुर्भे-वाशी-नेरुळ ही रेल्वेसेवा कमालीची फायदेशीर ठरली आहे. या पाश्र्वभूमीवर ऐरोली-ठाणे या दोन रेल्वे स्थानकां दरम्यान दिघा तसेच कोपरखैरणे-तुर्भे दरम्यान बोनकोडे रेल्वे स्थानकाची उभारणी केली जावी, अशास्वरूपाचा प्रस्ताव ठाण्याचे खासदार संजीव नाईक यांनी वर्षभरापूर्वी मांडला. ऐरोली ते ठाणे या दोन रेल्वे स्थानकांमध्ये तब्बल आठ मिनिटांचे अंतर असून गेल्या काही वर्षांत दिघा परिसराचा झालेला विकास पाहता या ठिकाणी नवे रेल्वे स्थानक उभारले जाणे आवश्यक आहे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. विशेष म्हणजे, खासदार नाईक यांची मागणी रेल्वे प्रशासनानेही उचलून धरली आहे. बोनकोडे आणि दिघा अशा दोन नव्या स्थानकांना तत्त्वत: मंजुरी देण्याचा विचार रेल्वे बोर्डाने सुरू केला असून यासंबंधी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा विचारही केला जात आहे. तुर्भे-कोपरखैरणे स्थानकांदरम्यान आणखी एक स्थानक उभारले जावे का, याविषयी रेल्वेतील अभियंता विभागात वेगवेगळे मतप्रवाह असले, तरी दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यंतरी मंत्रालयात बोलाविलेल्या बैठकीत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिघा स्थानकाविषयी सकारात्मक भूमिका घेतली होती. या स्थानकाच्या उभारणीसाठी सिडकोने ५० टक्के खर्चाचा भार उचलावा, असे रेल्वेचा आग्रह आहे. यासंबंधीचा ठोस प्रस्ताव अद्याप सिडकोकडे रवाना झालेला नाही. दरम्यान, दिघा रेल्वे स्थानकाच्या उभारणीविषयी सार्वमत होत असले तरी त्यासाठी लागणारी जागा कोठून उपलब्ध करायची, असा सवाल सध्या रेल्वेतील अभियंता विभागात व्यक्त होऊ लागला आहे. ऐरोलीलगत असलेल्या दिघा परिसराला मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ांचा विळखा बसला असून, या ठिकाणी मोकळ्या भूखंडांवर बिनधोकपणे बांधकाम करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. रेल्वे स्थानकासाठी काही एकर क्षेत्रफळाच्या भूखंडाची आवश्यकता असून त्यासाठी झोपडय़ा हटविण्यासाठी पर्याय नाही, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘वृत्तान्त’ला दिली. ही कारवाई करताना झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही पुढे येणार आहे. त्यामुळे हे स्थानक नेमके कोठे उभारता येईल, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुनर्वसन शक्य
दिघा स्थानकाच्या उभारणीसाठी झोपडय़ांच्या विस्थापनाशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केले. मात्र, हे विस्थापन करत असताना पुनर्वसनाचे धोरणही ठरविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिघ्यातील संजय गांधीनगरास लागूनच असलेली सुमारे ३० एकरहून अधिक जागा रेल्वे स्थानकासाठी निवडली जाऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.