बोरिवलीतील ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्याना’च्या धर्तीवर गोराईमधील पेप्सी उद्यान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी क्रीडांगणा’चा कायापालट करण्याची मुंबई महानगरपालिकेची योजना आहे. सावरकर उद्यानात लहानांपासून थोरांपर्यंतच्या मनोरंजनाकरिता विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केवळ बोरिवलीतीलच नव्हे तर दहिसर, कांदिवली, चारकोप, मालाड येथील रहिवासीही लहान मुलांसमवेत सुट्टीकरिता या उद्यानाची वाट पकडतात. आता याच उद्यानाच्या धर्तीवर पेप्सी उद्यानाचाही विकास करण्यात येणार आहे.
बोरिवलीत उद्यानांचा विकास हा विषय नेहमीच राजकीय अजेंडय़ावर राहिला आहे. त्यातून काँग्रेसचे गोराईतील नगरसेवक शिवा शेट्टी पालिकेच्या उद्यान समितीवर आहेत. त्यांनीच पेप्सी उद्यानाच्या विकासाकरिता पुढाकार घेतला आहे. या उद्यानाच्या विकासाकरिता पालिकेने तब्बल चार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पेप्सी उद्यानाच्या विकासातून येथील भारतीय जनता पक्षाला शह देण्याचाही शेट्टी यांचा प्रयत्न आहे. कारण, बोरिवलीतून आधी आमदार आणि आता लोकसभेवर निवडून गेलेले भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी आपल्या कार्यकाळात उद्यानांकरिता राखीव असलेल्या जागा अतिक्रमणापासून मोठय़ा प्रमाणात वाचविल्या. त्यांच्या या लौकिकावर बोरिवलीकरांनी शेट्टी यांना वारंवार निवडूनही दिले. आता भाजपकरिता ‘यूएसपी’ ठरलेल्या या मुद्दय़ाच्या आधारे आपले गोराईतील स्थान पक्के करण्याचा शेट्टी यांचा प्रयत्न आहे. या राजकीय ‘उद्यानबाजी’त गोराईकर मात्र सुखावणार आहेत. कारण, गोराईकरांना सुट्टी घालवण्याकरिता कायम सावरकर उद्यान किंवा कांदिवलीच्या रघुलीला सारख्या एखाद्या मॉलचा रस्ता धरावा लागतो. पेप्सी उद्यानाचा विकास झाला तर गोराईकरांच्या पथ्यावरच पडणार आहे.

उद्यानात नवे काय काय..
*  जॉगिंग ट्रॅक
* ज्येष्ठांसाठी ४०० फुटांचे विरंगुळा केंद्र
* त्यात  कॅरम, बुद्धिबळ, पत्ते अशा बैठय़ा खेळांची सोय
* लहान मुलांसाठी चार हजार फुटांचे रबर मॅट
* या ठिकाणी विविध खेळ व नृत्याच्या सरावाची सोय
* स्केटिंग सरावासाठीही स्वतंत्र सोय
* क्रिकेटची खेळपट्टी
* कबड्डी, फूटबॉल, बास्केटबॉल, खो-खो, मल्लखांब या खेळांकरिता वेगळी व्यवस्था
* योग साधनेसाठी स्वतंत्र सोय
* उद्यानाच्या सुशोभीकरणारिता हिरवळ, रोषणाई, साऊंड सिस्टीम, प्रवेशद्वाराची सजावट, संरक्षक भिंतींना जाळी लावण्यात येणार आहे.

उद्यानात नवीन सुविधा दिल्यानंतर कंत्राटदार दोन वर्षे या मैदानाच्या देखभालीची, सुरक्षेची जबाबदारी सांभाळेल. त्यानंतर इतल्या रहिवाशांच्या देखरेखीखाली उद्यानाचे नीट जतन होईल, अशी व्यवस्था करण्यात येईल. –
 शिवा शेट्टी, काँग्रेस नगरसेवक