पारगमन वसुली ठेकेदाराच्या मागील अनुभवावरून शहाणे होऊन किमान आता तरी महापालिका प्रशासनाने नव्या ठेकेदाराबरोबर करार करताना मनपाच्या हिताच्या दृष्टीने त्यात काही बाबींचा अंतर्भाव करावा, अशी मागणी उपमहापौर गीतांजली काळे यांनी आज मनपा आयुक्तांकडे केली.
यापूर्वीचा ठेकेदार कशा पद्धतीने परप्रांतियांची लूट करत होता, ते पुराव्यानिशी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. प्रशासनाने त्याच्याबरोबर करार व्यवस्थित केला नसल्यानेच अशा गैरगोष्टी होत होत्या, असे श्रीमती काळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे करारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा ते मुद्देच त्यांनी आयुक्तांना निवेदनात दिले आहेत.
मनपाच्या सर्व नाक्यांवर संगणकाद्वारेच पावती देणे बंधनकारक करावे, ठेकेदाराच्या सर्व कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावे व सर्वाना सारखा गणवेश असावा, कर्मचारी बदलले तर त्यांची नावे मनपाकडे द्यावीत, सर्व नाक्यांवर दराचे लिखित, तसेच डिजीटल तक्ते लावलेले असावेत, प्रत्येक नाक्यावर सीसी टिव्ही कॅमेरे असावेत व त्याचे चित्रिकरण आयुक्त, महापौर, उपमहापौर यांच्या दालनात दिसावे, करार करताना सरकारी मुद्रांक शुल्क जमा करणे सक्तीचे असावे असे मुद्दे श्रीमती काळे यांच्या निवेदनात आहेत.
ठेकेदाराच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने त्वरित जकात अधीक्षकांची नियुक्ती करावी व नाक्यांवर काहीही गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराबरोबरच या अधीक्षकांवरही निश्चित करावी, अशीही मागणी श्रीमती काळे यांनी केली आहे.