सामाजिक प्रबोधन चळवळीत सक्रिय असणाऱ्या त्रमासिक परिवर्त जनता परिवाराच्या वतीने १० मे रोजी येथे परिवर्त साहित्य परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष आणि अखिल भारतीय शामराव विठ्ठल सहकारी बँकेचे संचालक रवी पगारे तसेच निमंत्रक प्रा. गंगाधर अहिरे यांनी दिली.
 गंजमाळजवळील रोटरी क्लब सभागृहात कॉ. गोविंद पानसरे साहित्य नगरीत सकाळी ९.३० वाजता परिषदेचे उद्घाटन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते होणार आहे. आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक सुधाकर गायकवाड अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई येथील प्राचार्य डॉ. बी. बी. प्रधान करणार असून उद्घाटनप्रसंगी परिवर्त विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना महाकवी वामनदादा कर्डक ‘वादळवारा’ आणि कवी अरुण नाईक (सिंधुदुर्ग), संतोष कांबळे (मालेगाव) यांना अरुण काळे स्मृती ‘अजातशत्रू’ काव्य पुरस्काराने गौरविण्यात येईल.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रात नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत प्रा. गंगाधर अहिरे आणि रंगकर्मी दत्ता पाटील घेतील. तिसऱ्या सत्रात ‘परिवर्त चळवळीत महिलांचा सहभाग धूसर झाला आहे’ विषयावर औरंगाबादच्या प्रा. मंगला खिवंसरा यांचे व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते करुणासागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी अभियंता सुनील तिरमारे यांच्या उपस्थितीत होईल.
या वेळी अ‍ॅड. दौलतराव घुमरे, नाटय़लेखक भगवान हिरे, चंद्रभागा भरणे, सुरेश भवर, कवी काशिनाथ वेलदोडे यांनाही गौरविण्यात येणार आहे. अखेरच्या सत्रात प्रसिद्ध साहित्यिक किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध गीतकार सुधीर भगत, प्रकाश होळकर, अविनाश गायकवाड, समीक्षक डॉ. पद्माकर तामगाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्य़ातील कवींचे काव्य संमेलन होणार आहे. परिषदेस अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किशोर शिंदे, मधुकर पवार, रोहित गांगुर्डे, शामराव बागूल आदींनी
केले आहे.