कल्याण-डोंबिवली पालिका परिवहन समिती सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांपासून शहरांतर्गत बसची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा करणारे परिवहन समिती सभापती अशोक गोडबोले आपल्या पदाची मुदत संपत आली तरी ही बससेवा सुरू शकले नाहीत. आता पदावरून जाता जाता मात्र ‘करून दाखविले’ हे सिद्ध करून दाखविण्यासाठी २३ मार्गावर परिवहनची बससेवा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. परिवहन उपक्रमात २० नवीन मिडी बस दाखल झाल्याने या बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे गोडबोले यांनी सांगितले.
३० जानेवारी रोजी सुभाष मैदान येथून या बस सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या मार्गामध्ये बससेवेचे सहा नवीन मार्ग आहेत.  डोंबिवलीतील बसचे मार्ग : चोळेगाव-खंबाळपाडा, डोंबिवली-सागर्ली-गोग्रासवाडी, डोंबिवली-फुले रोड, डोंबिवली-दीनदयाळ रोड, डोंबिवली-आगासन, डोंबिवली-दावडी-रिजन्सी, डोंबिवली-गांधीनगर-नवजीवननगर, डोंबिवली-कुंभारखाणपाडा-कोपर, डोंबिवली-गरिबाचा वाडा. कल्याणमधील बसचे मार्ग : कल्याण-दूधनाका-पारनाका, कल्याण-योगीधाम-गौरीपाडा, कल्याण-अटाळी-आंबिवली रेल्वे स्थानक, कल्याण-बंदरनाका-वलीपीरनाका, कल्याण-अग्रवाल महाविद्यालय-गांधारी, कल्याण-ठाणगेवाडी-म्हसोबा मैदान, कल्याण पूर्व-सिद्धार्थ नगर-तिसाई देवी, कल्याण पूर्व-गणेश मंदिर-चिंचपाडा, टिटवाळा-गणेश मंदिर. दरम्यान, डोंबिवलीतील काही  अरुंद रस्त्यावरून   परिवहन सेवा कशी सुरू राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.