जासई ग्रामस्थांच्या मागणीनुसार उरणमधील दास्तान ते दिघोडा दरम्यान रस्त्यावर अवजड वाहनांना वाहतूक बंद करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना दिले होते. मात्र या बेकायदा वाहतुकीमुळे मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांनी थेट उपायुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचे चित्र आहे. यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अपघाताची टांगती तलवार ग्रामस्थांना कायम असून ही धोकादायक वाहतूक बंद न केल्यास जासई ग्रामस्थ संघर्ष समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अवजड वाहनांच्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे हा रस्ता अपघातांचे केंद्र बनला आहे. मध्यवर्ती ठिकाण आणि जासई शाळा यामुळे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठय़ा प्रमाणात रहदारी सुरू असते. अरुंद असलेल्या या रस्त्यावरून एकाच वेळी दोन मोठी वाहने जाणे शक्य नसतात, या मार्गावरून जाणाऱ्या कंटेनरमुळे अपघाताच्या घटना घडत असतात. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी आहे. मात्र या परिसरात अनाधिकृतपणे उभी असलेल्या गोदामांमुळे ही अवजड वाहने बेकायदेशीररीत्या येथून मालाची वाहतूक करीत. या ठिकाणी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने बसविलेले हाइट गेट वाहतूकदारांनी तोडले आहेत. या चालकांकडून वाहतूक पोलिसांचे हात ओले होत असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने मोठय़ा प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे.
या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात यावी अशी मागणी जासई ग्रामस्थ संघर्ष समितीने वाहतूक पोलीस उपायुक्त विजय पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली होती. या संदर्भात उपायुक्तांनी १७ जून २०१४ रोजी पत्र पाठवून दास्तान फाटा ते दिघोडे दरम्यानची अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश उरणच्या स्थानिक वाहतूक शाखेला दिल्याचे पत्राची पोच समिताला देण्यात आलेल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे. समितीकडून करण्यात आलेल्या पत्र व्यवहारांची उपायुक्तांनी सातत्याने दखल घेतली असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्थानिक कर्मचाऱ्यांना अवजड वाहनांना बंदीचे आदेश देण्याबरोबर त्यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणा  ८ मे, ४ जून तसेच १७ जून या तारखांना पत्र पाठवून दास्तान दिघोडे मार्गावरील अवजड वाहतूक बंदीसाठी हाइट गेट बसविण्यासाठी मागणी केली होती. मात्र त्याकडे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही वाहतूक सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. उपायुक्तांनी उरण वाहतूक शाखेला या मार्गावरील अवजड वाहनांना बंदी करण्याचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने समितीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.