अखेर पनवेलकरांना ती बस दिसली. त्या बसच्या प्रतीक्षेत अनेक वर्षांपासून सामान्य पनवेलकर आहेत. ही बस पनवेलच्या चिंचोळ्या रस्त्यांवर कधी धावेल, सामान्य प्रवाशांना त्यांच्या अखेरच्या थांब्यापर्यंत कशी पोहचवेल अशी उत्कंठा सामान्यांना लागली आहे. दोनच दिवसांपूर्वी अशोक लेलॅंड कंपनीची ही बस पनवेल नगरपालिकेच्या मैदानात अवतरली आणि पुन्हा एकदा प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. या बसचा पहिला पाहुणचार आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्षा चारुशीला घरत आणि नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी घेतला. मात्र प्रत्यक्षात ही बससेवा पनवेलच्या रस्त्यावरून चालण्यासाठी पनवेलच्या प्रवाशांना दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर आता जनसामान्यांच्या मनात आघाडीच्या नेत्यांची जागा निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस लोकप्रतिनिधींनी हार न मानता कंबर कसून प्रत्यक्षात कामांना सुरुवात केली आहे. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती विधानसभा निवडणुकांपूर्वी करण्यासाठी पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून सिटीबस योजना राबविण्यासाठी आमदार ठाकूर प्रयत्नशील आहेत. पनवेल पालिकेत कॉंग्रेसची सत्ता असल्याने राज्य सरकार दरबारातील अडीअडचणींसाठी आमदार ठाकूर हे अस्त्र वापरून नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप हे योजना राबविण्याच्या मार्गावर आहेत. सामान्य पनवेलकरांना सोयीची अपेक्षा आहे. कोण करतो त्यापेक्षा सोय महत्त्वाची अशी सामान्यांची धारणा आहे.