कल्याण-पनवेल मार्ग सर्वच महापालिकांच्या परिवहन सेवांसाठी सर्वाधिक उत्पन्न देणारा ‘समृद्ध’ मार्ग म्हणून ओळखला जातो. असे असूनही या भागातून रात्रीच्या वेळी सर्वात कमी गाडय़ा सोडल्या जातात. केडीएमटी, एनएमएमटी आणि एसटी अशा तिहेरी वाहतूक सेवा या भागात असल्यामुळे या मार्गावर निकोप स्पर्धेची अपेक्षा बाळगली जात होती. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात प्रवाशांना सेवा देण्यात या परिवहन सेवा अपुऱ्याच पडत आहेत. कल्याण-पनवेल मार्गावर रात्रीच्या वेळेत अपवादानेच बस धावत असल्याने प्रवासी सर्वच परिवहन सेवेच्या नावाने खडे फोडताना दिसू लागले आहेत. कल्याण-डोंबिवली शहरातील हजारो प्रवासी नवी मुंबई आणि पनवेल शहरात ये-जा करतात. या मार्गावरील रेल्वे प्रवास मोठय़ा गर्दीतून तसेच वेळकाढू ठरतो. त्यामुळे वळसा घालून होणारा प्रवास चुकवण्यासाठी कल्याण-वाशी, पनवेल मार्ग प्रस्तावित त्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावे लागणार आहे. सद्य:स्थितीत या भागातून धावणारी परिवहन सेवेच्या बसेस प्रवाशांसाठी चांगला पर्याय आहेत. मात्र, सर्वच परिवहन उपक्रमांनी या मार्गाकडे दुर्लक्ष केल्याचे सध्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवली शहरातून पनवेल, वाशी आणि कोकण भवन या तीन मार्गावर केडीएमटी सेवेच्या सकाळी सात, तर दुपारच्या सत्रात ७ अशा फे ऱ्या होतात. सकाळी ६.४५ वाजता पहिली गाडी कल्याणमधून सुटते तर पनवेलहून ८.२० वाजता पहिली गाडी पुन्हा परतीचा प्रवास करते. कल्याणहून रात्री उशिरा ९.५० वाजता पनवेलसाठी बस सुटते, तर या बसचा परतीचा प्रवास रात्री ११.३० वाजता सुरू होतो. त्यानंतर या भागातून केडीएमटीची एकही गाडी सुटत नाही. कल्याण परिवहन सेवेला या गाडय़ांमधून दिवसाला सुमारे दीड लाखाहून अधिक उत्पन्न मिळते. इतर फे ऱ्यांच्या तुलने हे उत्पन्न मोठे असले तरी रात्री उशिरा या भागात सेवा पुरविण्यात केडीएमटी प्रशासनाला फारसे स्वारस्य नसल्याचे दिसून येते. एसटी महामंडळाची सकाळची पहिली गाडी पहाटे ३.०५ वाजता सुटते. त्यानंतर प्रत्येक तासाला गाडी असली तरी रात्री ११.४५ वाजता गाडी सुटल्यानंतर या भागातून एकही गाडी धावत नाही. एनएमएमटी वाहतूक सेवेचीसुद्धा अशीच परिस्थिती आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सर्वाधिक भार हा एसटी महामंडळाच्या सेवेवर आहे.

पनवेल स्थानकातील दुरवस्थेचा त्रास..
मध्यरात्री ११.४५ ते ३.०५ या सुमारे तीन तासांमध्ये एकही गाडी पनवेल अथवा कल्याण स्थानकातून सुटत नाही. त्यामुळे रात्री उशिरा काम संपवून परतणाऱ्या प्रवाशांना, कोकणातून कल्याण-डोंबिवलीकडे येणाऱ्या प्रवाशांना ताटकळत आगारामध्ये बसावे लागते. विशेष म्हणजे पनवेल स्थानकातून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांसाठी उभारण्यात आलेली नियंत्रण कक्ष, प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अत्यंत जुनी झाली असून अस्वच्छतेत बरबटलेल्या या भागात प्रकाशासाठी दिवे, पंखे आणि पाण्याची व्यवस्थाही नाही. किमान सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी या भागातून कल्याणकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आहे.

मागणी नसल्याने सेवा नाही..
केडीएमटीच्या पुरेशी वाहतूक सेवा कल्याण-पनवेल मार्गावर आहेत. या सेवांमध्ये वाढ करून तसेच फेऱ्यांमधील सातत्य वाढवून जास्तीत जास्त प्रवाशांना केडीएमटीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. मात्र रात्री उशिरा या भागात गाडय़ांची मागणी नसल्याने रात्री उशिरा या भागातून वाहतूक बंद ठेवत असल्याची माहिती केडीएमटीचे महाव्यवस्थापक सुधीर राऊत यांनी दिली.