ओ.एन.जी.सी., भारत पेट्रोलियम, आय.ओ.टी.एल. तसेच जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या अतिसंवेदनशील ज्वलन पदार्थामुळे उरण अपघातप्रवण आहे. त्यामुळे येथे ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने सिडको तसेच राज्य सरकारकडे केली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुका हा केवळ राज्यातच नव्हे तर देशातील एक अग्रगण्य औद्योगिक तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र पुरेशा वैद्यकीय सुविधांच्या अभावी या औद्योगिक क्षेत्रातील अपघातांमधील जखमींची खूपच हेळसांड होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना नाहक जीवही गमवावा लागतो. त्यामुळे येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणी सामाजिक संस्थेने केली आहे.
उरणच्या समुद्रकिनारी ओ.एन.जी.सी.चा बॉम्बे हाय तेल विहिरीतील कच्चे तेल शुद्ध करणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पात गॅस, पेट्रोल, डिझेल तसेच अतिज्वलनशील असा नाफ्ताही आणला जात असून, त्याची साठवणूक या प्रकल्पात केली जात आहे. या अतिज्वलनशील नाफ्त्याला आग लागल्याच्या अनेक घटना ओ.एन.जी.सी. परिसरात घडल्या आहेत.
अशाच एका घटनेत दोन ग्रामस्थांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत, तर कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे जेएनपीटी बंदरातूनही नाफ्ता, डिझेल, पेट्रोल तसेच इतर द्रवपदार्थाची आयात केली जात आहे.
 या द्रवपदार्थाची साठवणूक जेएनपीटी परिसरात केली जात असून, अनेकदा या परिसरातील तेल वाहिन्यांना छिद्र पाडून तेलाची चोरी करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
त्यामुळे तेल गळतीमुळे या परिसरात आगीचाही धोका वाढला आहे. ओ.एन.जी.सी., भारत पेट्रोलियम, तसेच जेएनपीटी बंदरातून येणाऱ्या लाखो मेट्रिक टन तेलाची साठवणूक या परिसरात केली जात आहे.
दुसरीकडे उरण तालुक्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अपघातांच्याही प्रमाणात वाढ झालेली असून हजारो जण त्यामुळे गंभीर जखमी झाले असून, अनेकांना आपले हातपाय गमवावे लागले आहेत. तसेच अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे उरण परिसरात तातडीने ट्रॉमा सेंटर सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.