बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे काय हाल होतात, त्यांच्या समस्या तरी काय हे जाणून घेण्यासाठी राज्याचे परिवहन राज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ते जामनेर असा बसमधून प्रवास केला. स्वत: तिकीट काढत बसमधील सर्वाच्या एसटी संदर्भातील अडचणी, तक्रारी व सूचना जाणून घेतल्या.
दुष्काळ व टंचाईग्रस्त जामनेर येथील टंचाई आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी देवकर यांचे जाणे निश्चित होते. त्यासाठी नेहमीप्रमाणे शासकीय वाहनाची व्यवस्था करण्यात आली. पण देवकर यांनी जामनेपर्यंत बसमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. अचानक त्यांनी जळगाव बस स्थानक गाठल्याने प्रशासकीय यंत्रणेची तारांबळ उडाली. देवकर सकाळी साडेआठच्या जामनेर बसमध्ये बसले. विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारींची त्यांनी नोंद घेतली.
प्रमोद काळे या प्रवाशाने सकाळी साडे आठ वाजता जळगावहून तर सायंकाळी साडेपाच वाजता जामनेरहून जळगावसाठी बस सुरू करण्याची व फेऱ्या वाढविण्याची मागणी केली. परिवहन मंत्र्यांनी यावेळी बसमधील अस्वच्छ व फाटलेले सीट पाहून विभाग प्रमुखास त्या बद्दल सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. जामनेर आगाराची पाहणी करून तेथे स्वच्छता ठेवण्याचे आदेश दिले. बससेवे संदर्भात प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असतात. त्या जाणून घेणे, बसमधील स्वच्छता व स्थितीची पाहणी करणे, हा आपल्या बस प्रवासाचा उद्देश होता, असे देवकर यांनी सांगितले.