सार्वजनिक बांधकाम विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत पाच गावांमधील खासगी वाहनांना खारघरची टोलसवलत मिळाली आहे. मात्र तळोजा एमआयडीसीकडून येणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारच्या वाहनांना खारघर व कामोठे टोलनाक्यातून सवलत मिळणार असल्याने सध्या रोडपाली लिंक रोड हा मार्ग टोलमुक्त मार्ग म्हणून ओळखला जात आहे. भविष्यात या मार्गावरील ताण चार पटींनी वाढेल, आजमितीला या मार्गाचे काम सुरू असल्याने या मार्गावरील दुहेरी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू आहे. मात्र या मार्गाचा अवलंब करणाऱ्या कोणत्याही वाहनांना त्यामुळे खारघर व कामोठे हे दोन्ही टोलनाके टोलमुक्त झाले आहेत.
पनवेल तालुक्यातील पाच गावांना सूट मिळणाऱ्या अधिसूचनेत तळोजा एमआयडीसीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सवलत मिळाल्याने खारघर टोलचा मोफत प्रवास करायचा असल्यास रोडपाली लिंक रोडचा मार्ग अवलंबण्याचे सत्कार्य काही वाहतूकदारांनी निवडले आहे. कळंबोलीशेजारी असणाऱ्या लोखंड बाजारात सुमारे वीस हजार वाहने आहेत. या वाहनांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तसेच पुण्याहून पनवेलकडे येताना पनवेल-मुंब्रा मार्गाने आल्यास रोडपाली लिंक रोडमार्गे गेल्यास खारघर टोलनाक्यातून सर्व अवजड वाहनांना सूट मिळणार आहे. या सर्वाचा फटका रोडपाली नोडला बसणार आहे. या मार्गावर अवजड वाहतुकीचा ताण वाढेल. टोल वसूल करणाऱ्या एसपीटीपीएल कंपनीने या मार्गावरून टोलमध्ये सवलतीसाठी बिल्ला योजना राबविली आहे. रोडपाली लिंक रोडमार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना या बिल्ला योजनेमार्फत टोलसवलतीचा लाभ घेता येणार आहे. रोडपाली उड्डाणपुलाजवळ एसपीटीपीएल कंपनीने आपले कर्मचारी उभे केले आहेत. हे कर्मचारी या वाहनांना हे बिल्ले देणार आहेत. टोलनाक्यावर ते वाहन पोहोचल्यावर तेथील टोल कर्मचाऱ्यांना हा बिल्ला दिल्यावर आपले वाहन टोलधाडीतून निसटू शकणार आहे. या बिल्ला योजनेचा फायदा औद्योगिक वसाहतीमधील सर्व वाहनांसोबत कळंबोली लोखंड बाजारातील वाहतूकदारांच्या वाहने व ज्या गावांना टोलमधून सवलत मिळाली नाही अशा सर्व वाहनमालकांना ती मिळविता येणार आहे. पनवेल तालुक्यातील वाहनांप्रमाणे बाहेरगावाहून येणारे वाहनचालक या मोफत मार्गाचा मोठय़ा प्रमाणात अवलंब करीत असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावर अवजड वाहनांची मोठी गर्दी असते.
१४ वर्षे टोल वसूल केला जाणार आहे. त्यामुळे एसपीटीपीएल कंपनीने येथे वाहनांच्या संख्येप्रमाणे बिल्लावाटपाचे नियोजन करावे. किमान रोडपाली लिंक रोड संपल्यावर एसपीटीपीएलच्या कर्मचाऱ्यांनी चालकांना तो बिल्ला दिल्यास वाहनधारकांचा वेळ वाया जाणार नाही. ज्या शिताफीने टोलचे पैसे घेण्यासाठी नियोजन आहे तसेच नियोजन वाहनचालकांना बिल्ला वाटताना केल्यास वाहनचालकांना मोफत प्रवासाला विलंब होणार नाही, अशी अपेक्षा वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.