14 December 2017

News Flash

गर्दीच्या दुखण्यावर सरकत्या जिन्यांची मलमपट्टी

दिवसरात्र गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात येत्या १५ मार्चपासून सरकते जिने कार्यान्वित

प्रतिनिधी, ठाणे | Updated: February 15, 2013 2:02 AM

* अरुंद चढ-उताराने चेंगराचेंगरी नित्याची
* विस्तारीत स्थानक हाच पर्याय
दिवसरात्र गर्दीने अक्षरश: ओसंडून वाहणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकात येत्या १५ मार्चपासून सरकते जिने कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असला तरी हे जिने प्रवाशांच्या गर्दीवर उतारा ठरू शकतील काय, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांपैकी पहिले दोन जिने ठाणे रेल्वे स्थानकातील नव्या पादचारी पुलावर कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मुळात नवा पादचारी पूल उभारूनही फलाट क्रमांक तीन-चार आणि पाच-सहावरील गर्दी फारशी कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. गर्दीच्या वेळेत नव्या पादचारी पुलांवरून चढ-उतार करताना अक्षरश: चेंगराचेंगरी होते की काय, असे चित्र पाहावयास मिळते. जुन्या पादचारी पुलांवर तर याहून भयावह चित्र दिसते. या पाश्र्वभूमीवर गर्दीचा भार असह्य़ झालेल्या ठाणे स्थानकात लहान-सहान उपायांसोबत मूळ रोगावर औषध शोधण्याची गरज अधिक आहे, अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.  
रेल्वे मंत्रालयाच्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानकात दररोज सुमारे पाच लाख प्रवाशांची ये-जा असते. गेल्या वर्षभरात हा आकडा आणखी वाढला आहे. एवढा मोठा भार असणाऱ्या या स्थानकात ठोस अशा सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी जागतिक दर्जाच्या स्थानकांच्या यादीत ठाण्याचा समावेश केला. या रेल्वे स्थानकास ‘वर्ल्ड क्लास’ टच देण्यासाठी कोटय़वधी रुपयांची तरतूदही करण्यात आली. मात्र जागतिक रेल्वे स्थानकाची घोषणा पुढे हवेत विरली आणि ठाणेकर प्रवाशांच्या पदरी पुन्हा एकदा निराशेचे भोग आले. दरम्यानच्या काळात खासदार संजीव नाईक यांच्या आग्रहामुळे तिसऱ्या पादचारी पुलाचे काम पूर्ण झाले आहे.
 तिसऱ्या पादचारी पुलासोबत वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून सहा मीटर रुंदीचे आणखी दोन लहान पादचारी पूल उभारण्यास रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने या पुलांची बांधणी होणार आहे. वर्षांनुवर्षे उपेक्षित राहिलेल्या ठाणे स्थानकातील पायाभूत सुविधांसाठी वेगवेगळे प्रकल्प आखले जात असताना येत्या १५ मार्चपासून स्थानकातील दहापैकी चार फलाटांवर सरकते जिने उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग अमलात आणण्याची तयारी सुरू झाली आहे. हे सरकते जिने कसे असतील याविषयी प्रवाशांमध्ये कमालीची उत्सुकता असली तरी दररोज गर्दीने नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या या स्थानकातील मूळ दुखण्यावर हे जिने प्रभाव पाडू शकतील का, असा सवाल प्रवाशांच्या मनातही डोकावू लागला आहे.

नव्या पुलानंतरही दुखणे कायम
ठाणे स्थानकात नवा पादचारी पूल उभारल्यानंतर गर्दीवर उतारा मिळेल, असा विश्वास सुरुवातीला व्यक्त केला जात होता. नव्या पुलामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी अरुंद अशा एन्ट्री-एक्झिट पॉइंटमुळे पुलावर चढ-उतार करताना चेंगराचेंगरी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. नव्या पादचारी पुलास दहा क्रमांकाच्या फलाटावर एक्झिट पॉइंट देण्यात आला असला तरी ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस सॅटिस पुलास या पुलाच्या जोडणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या नव्या पुलाचा भार दोन क्रमांकाच्या फलाटावर येतो, असे चित्र सध्या दिसते आहे. तसेच जुन्या पुलावरून थेट सॅटिसवर उतरता येत नसल्याने मोठय़ा संख्येने प्रवासी अजूनही जुन्याच पुलाचा वापर करताना दिसतात.
ट्रान्स हार्बरचा भार
ठाणे-वाशी-नेरुळ-पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरील गाडय़ा पकडण्यासाठी प्रवाशांना नऊ आणि दहा क्रमांकाचे फलाट गाठावे लागते. नव्या पादचारी पुलास सॅटिसवर जोडणी नसल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवासी अजूनही जुन्याच पादचारी पुलाचा वापर करताना दिसतात. त्यामुळे पादचारी पुलावरील गर्दी अजूनही कायम आहे. या पाश्र्वभूमीवर तीन-चार आणि पाच-सहा फलाटावर उभारण्यात येणाऱ्या सरकत्या जिन्यांमुळे मूळ गर्दीचा प्रश्न सुटेल का, असा सवाल उपस्थित होत आहे. ठाणे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाय शोधण्यासाठी विस्तारीत किंवा नव्या स्थानकाची गरज आहे. असे असताना सरकत्या जिन्यांसारखे पर्याय मूळ दुखण्यावर तात्पुरता उपाय ठरू शकतील, असे मत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

First Published on February 15, 2013 2:02 am

Web Title: treatment of escalator stairs on problems of crowd