कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी सुमारे ७० टक्के जादा पाऊस झाला आहे. परिणामी खरिपाच्या पेरण्या उत्साहात होत असून, कोयना धरण तुलनेत अगदीच लवकर भरण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. गतवर्षी ५ जूनला पावसाने जोरदार हजेरी लावून सलग २० दिवस दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या धोक्यात आल्या होत्या. याखेपेस मात्र, पावसाने पहिल्या सत्रात जोरदार हजेरी लावली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भरमसाठ असा तिप्पट पाऊस कोसळल्याची समाधानकारक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळल्याने दुष्काळाच्या चर्चेला तूर्तासतरी विश्रांती मिळाली आहे.
कोयना धरणाचा पाणीसाठा सध्या ४७.७१ टीएमसी म्हणजेच ४५.३३ टक्के असून, गतवर्षी आजमितीला हाच पाणीसाठा २७.७१ टीएमसी म्हणजेच २६.२५ टक्के  असा चिंताजनक होता. धरणक्षेत्रात गतवर्षी आजमितीला सरासरी ४१७.३३ मि. मी., यंदा हाच पाऊस १३५८.२५ मि. मी. म्हणजेच ६९.२८ टक्के जादा पाऊस झाला आहे. धरणाखालील कराड तालुक्यात गतवर्षी आजअखेर ५९ मि. मी. पाऊस झाला होता. सध्या सरासरी १५८.०६ मि. मी. पाऊस नोंदला गेला असून, गतवर्षीच्या तुलनेत तो ६२.७९ टक्क्यांनी जादा आहे.
पाटण तालुक्यात कोयना धरण क्षेत्रातील नवजा व हेळवाक वगळता गतवर्षी आजमितीला सरासरी १०२ मि. मी. पावसाची नोंद आहे.  सध्या हाच पाऊस २५२.८ मि. मी. म्हणजेच गतवर्षीपेक्षा ७५.२२ टक्क्याने जादा कोसळला आहे. यंदा कोयना धरणक्षेत्रातील महाबळेश्वर विभागात सर्वाधिक १४०० मि. मी. पावसाची नोंद आहे. गतवर्षी नवजा विभागात आजअखेर सर्वाधिक ५५० मि. मी. पावसाची नोंद झाली होती. चालू हंगामात धरणक्षेत्रातील प्रतापगड विभागात १३९८ व कोयनानगर विभागात १२९४ मि. मी., नवजा विभागात १३४१, पाऊस नोंदला गेला आहे. हा सरासरी पाऊस १३५८.२५ मि. मी. असून, गतवर्षी हाच सरासरी पाऊस ४१७.३३ मि. मी. नोंदला गेला आहे. याखेपेस आजअखेर ६९.२७ टक्के जादा पाऊस झाला आहे. गतवर्षी महाबळेश्वर विभागात ३५६ तर, कोयनानगर विभागात ३४६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज दिवसभरात कोयना धरणक्षेत्रात सरासरी २९.२५ मि. मी.पाऊस कोसळला आहे. तर, आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पाटण तालुक्यात १५.६ तर कराड तालुक्यात ३.७६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दिवसभरात या दोन्ही तालुक्यात ढगाळ वातावरण राहताना काही ठिकाणी पावसाची रिपरिप राहिल्याचे वृत्त आहे.