शालेय विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत दरवर्षी आकर्षण असणाऱ्या वनश्री महोत्सवाचे आयोजन याही वर्षी २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत होत असून, नावीन्यपूर्ण वृक्षांची माहिती या निमित्ताने लातूरकरांना होणार आहे.
गेल्या १७ वर्षांपासून लातुरात वनश्री महोत्सव सातत्याने आयोजित केला जातो. लातूरमध्ये वृक्षलागवडीची आवड जोपासली जावी. सुंदर लातूर, हरित लातूर ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्यक्षात उतरावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी वृक्षप्रेमी मंडळी लातुरात सक्रिय आहेत. १७ वर्षांपूर्वी वनश्री महोत्सवाची कल्पना समोर आली. त्या वेळी लातुरात घरगुती, शासकीय, निमशासकीय अशा सर्व बागांची संख्या केवळ २५०च्या आसपास होती. २०१३मध्ये ही संख्या ३ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या १७ वर्षांत शहराचा विकास झपाटय़ाने झाला. मात्र, या विकासात वृक्षांचे स्थान असले पाहिजे याची जाणीव लोकांत निर्माण झाली, त्याचे श्रेय वनश्री मित्र मंडळाला जाते.
शहरातील वृक्षप्रेमींची गरज लक्षात घेऊन बागांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, यासाठी हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये २०० माळय़ांना आठ दिवस बागकामांचे प्रशिक्षण दिले गेले. हे प्रशिक्षित माळी अतिशय माफक दरात घरगुती बागेची देखभाल करतात. या महोत्सवाच्या दरम्यान शाळकरी मुलांमध्ये वृक्षाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. सेंद्रिय खते व बागकामाच्या साहित्याचे स्टॉल्स, सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाचे स्टॉल्स, गोवा येथील गोवा पॉटरीजचा स्टॉल, वनौषधीचे प्रदर्शन व स्टॉल्स, वाचनीय व संग्रहणीय कृषी पुस्तकांचे प्रदर्शन या महोत्सवात असते.
या वर्षी लातूरकरांसाठी १० ते १५ फूट उंचीची झाडे महोत्सवात उपलब्ध केली जाणार आहेत. ट्रीगार्डशिवाय ही झाडे लावता येतात, ज्याची किंमत फक्त ६०० रुपये आहे. या पशात वनश्री मित्रमंडळ झाड लावून देण्याची जबाबदारी घेणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात दुर्मिळ फुलांचे प्रदर्शन राहणार आहे. औरंगाबाद येथील वृक्षप्रेमी एस. दास यांच्या संग्रहातील डािन्सग प्लांट हे महोत्सवाचे आकर्षण राहणार आहे. संगीताच्या तालावर हे झाड डुलते व संगीत बंद झाल्यावर त्याचे डुलणे थांबते. त्यांच्या संग्रहातील किडे खाणारे झाडही नागरिकांनाही पाहता येणार आहे. जर्मनी, इस्त्राएल, अमेरिका येथे जाऊन स्वत: त्या झाडांची माहिती घेऊन दास यांनी त्यांची बाग विकसित केली आहे. त्यांच्याशी नागरिकांना संवाद साधता येणार आहे. लातूरचे वास्तुशास्त्रज्ञ कृष्णकुमार बांगड यांच्या पुढाकाराने ‘पर्यावरण अनुकूल घर कसे असावे?’ याचे मॉडेलच या प्रदर्शनात उपलब्ध राहणार आहे.
पर्यावरण अनुकूल घर बांधले तर त्यामुळे घराच्या आतील तापमान बाहेरच्या वातावरणापेक्षा कमी राहते याचे प्रात्यक्षिकही लोकांना पाहता येणार आहे. वनश्री महोत्सवाच्या निमित्ताने चित्रकला, निबंध, वक्तृत्व, आदींच्या स्पध्रेचे आयोजनही करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त महिलांनी वृक्षवाण योजना राबवावी यासाठी महिला मंडळांना आवाहन करण्यात येणार आहे. वनश्री मित्रमंडळाच्या पुढाकाराने यापूर्वी वृक्षप्रेमींच्या सहली काढण्यात आल्या होत्या. आगामी काळातील नियोजनही लोकांना सांगितले जाणार आहे. बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी वनश्री संस्कार कार्यक्रमाचे आयोजनही या महोत्सवादरम्यान केले जाणार आहे. वनश्री महोत्सव हा वनश्री मित्रमंडळाच्या पुढाकाराने भरवला जात असला तरी तो समस्त लातूरकरांचा व्हावा, यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत.
या महोत्सवात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व त्याचे प्रात्यक्षिक जयसिंगपूरचे गिरीश जाधव हे सादर करणार आहेत. या पाचदिवसीय महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार दिलीपराव देशमुख हे असून महोत्सव यशस्वीतेसाठी वनश्री मित्रमंडळाचे अध्यक्ष ईश्वर बाहेती, सचिव व्यंकटेश हािलगे, कार्याध्यक्ष संध्या िशदे, समन्वयक अर्जुन कामदार आदी परिश्रम घेत आहेत.