इचलकरंजी नगरपालिकेने बुधवारी लालनगर भागात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली. यापूर्वी दोन वेळा झालेल्या विरोधाप्रमाणे आजही तेथील नागरिकांनी विरोध दर्शविला. तथापि पोलीस बंदोबस्तात लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून आठ घरकुलातील अतिक्रमण काढण्याचे काम दिवसभर सुरू होते.
इचलकरंजी नगरपालिकेने औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पासाठी कुष्ठरोग वसाहतीतील ९ लाभार्थ्यांना पर्यायी घरकुल देण्याचे मान्य करून त्यांची जागा नगरपालिकेने घेतली होती. लाभार्थीनी उपोषण केल्यानंतर त्यांना लालनगरमध्ये घरकुल देण्याचा निर्णय झाला. तेही न मिळाल्याने त्यांनी प्रांत कार्यालयासमोर अलीकडेच बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यामुळे आज पालिकेने संबंधित लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी लालनगरमध्ये अतिक्रमण केलेली घरकुले रिकामी करण्याची मोहीम सुरू केली.    
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केल्यावर काही घरातून विरोध झाला. मंगल ओतारिया महिलेने विरोध केल्यावर महिला पोलीस नसल्याने पथक कारवाईविना ताटकळत उभे राहिले. कारवाई थांबविण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. अखेर महिला कॉन्स्टेबल आल्यानंतर ओतारियांचे घरकुल रिकामे झाले. आणखीही लाभार्थ्यांनी अशाच प्रकारे विरोध केला. मात्र पालिकेचे मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे शिवकुमार कांबळे, संपत चव्हाण यांच्यासह दहा अधिकारी, पंधरा कर्मचारी तसेच गावभागचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखालील पोलीसपथकाने ही मोहीम राबविली.