उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी २८ जानेवारी रोजी निवडणूक होत असून, या निवडणुकीसाठी एकूण ११ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ११ पैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना, शेकाप व भाजप या तीन पक्षांचे उमेदवारांत ही लढत होत आहे. त्यामुळे नवघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना, शेकाप व भाजप या महायुतीच्या मित्रपक्षातच लढत रंगणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत नवघर जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे सदस्य म्हणून निवडून आलेले मनोहर भोईर उरणचे आमदार झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-शेकाप व भाजप महायुतीच्या वतीने निवडणूक लढली गेली होती. तर या निवडणुकीत या तीनही मित्रपक्षात एकमत नसल्याने एकमेकांविरोधात ही निवडणूक लढविली जात आहे.
या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून तुकाराम कडू, शेकापचे प्रकाश म्हात्रे, तर भाजपकडून महेश कडू हे निवडणूक लढवीत असून, सेना व भाजपचे उमेदवार सोनारी या एकाच गावातील आहेत. या निवडणुकीतून मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविलेल्या काँग्रेसने माघार घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. २८ जानेवारी रोजी निवडणूक होणार असून ३० जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन चव्हाण यांनी दिली आहे.