अनंत घोटाळे, गैरव्यवहारांच्या कार्यबाहुल्यात व्यग्र असलेल्या ठाणे  महापालिकेने सध्या शहरांतील नाल्यांवर ‘त्रिभुज’ प्रदेश निर्मितीच्या महत्त्वपूर्ण उपकार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या नाल्यांतून गाळ हटवणे दूरच; पण भूमिगत गटारे बांधण्याची कामे अध्र्यावरच सोडणे आणि नाल्यालगतच्या अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन यांमुळे अनेक ठिकाणी गाळ, कचरा आणि घाणीचे ‘त्रिभुज प्रदेश’ निर्माण झाले आहेत. याचा परिणाम डासांचा मोठा प्रादुर्भाव होण्यात झाला असून त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नागरिकांनी तक्रारी करूनही हा ‘त्रिभुज प्रदेश’ हटवण्याकडे पालिकेने लक्ष दिलेले नाही.
करदात्यांनी अदा केलेल्या पैशांतून कोटय़वधी रुपयांच्या दिखाऊ नालेसफाईचा वार्षिक कार्यक्रम पावसाळ्याआधी करणाऱ्या महापालिकेचे इतर ११ महिने ‘त्रिभुज’ प्रदेश निर्मितीचे कार्य जोमात सुरू असते. पावसाळ्यात नाल्यांमध्ये भूमिगत गटारांचे काम करण्यात आले, मात्र हे काम वेगात सुरू झाले आणि तितक्याच वेगात थांबले. त्यामुळे विविध ठिकाणी काम सोडलेल्या जागांवर सिमेंट व इतर बांधकाम साहित्याचा लगदा तसाच ठेवण्यात आला. याचा परिणाम गाळ अडू लागला. त्यातच नाल्यांच्या भिंतींना खेटूनच उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपडय़ांतील सांडपाणी, कचराही या नाल्यात पडत आहे. उथळसर, सामंतवाडी येथील भागीरथी-जगन्नाथ सोसायटी आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सोसायटय़ांनी याबाबत तक्रारी करूनही काहीही कारवाई झालेली नाही. या संदर्भात महापालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्याशी वारंवार संपर्क साधून ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
इतका पैसा गाळात..
शहरातील नालेसफाईकरिता महापालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद करते. गेल्या वर्षी या निधीमध्ये दोन कोटी रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे तीन कोटी रुपये असणाऱ्या निधीचा आकडा पाच कोटींवर गेला होता. असे असतानाही शहरातील नाल्यांची अवस्था मात्र ‘जैसे थे’ आहे.
डेंग्यू आणि इतर अडचणी
नाल्यांमधील गाळामुळे या भागात मच्छरांची उत्पत्तीस्थाने वाढली असून भागीरथी-जगन्नाथ सोसायटी, प्रणव प्रसन्न सोसायटी यांमध्ये यंदा किमान १० नागरिकांना डेंग्यूचा तडाखा बसला. त्यांनी याबाबत महापालिकेमध्ये अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद पालिकेकडून देण्यात आला नाही. त्यानंतर सोसायटीमधील नागरिकांनी एकत्र येऊन पालिकेमध्ये गाऱ्हाणे मांडले. मात्र त्यावर आठवडय़ात कारवाई होईल, असे आश्वासन मिळून कैक आठवडे लोटले, अशी माहिती भागीरथी-जगन्नाथ सोसायटीचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.
अनधिकृत बांधकामांची सोबत
महापालिकेने नाल्यांवर उभारलेल्या भिंती त्या शेजारी उभारलेल्या झोपडय़ांच्या ‘आधारभिंती’ ठरत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने ही अनधिकृत बांधकामे विस्तारली जात असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. पालिकेची वार्षिक नालेसफाई देखावा मोहीम मे महिन्याआधी सुरू होणार नसल्याने, तोवर नाल्यांवरच्या या त्रिभुज प्रदेशामुळे आजारांसोबत दरुगधीची नवी भीषण समस्या निर्माण होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.