इगतपुरी येथील मौजे लहांगेवाडी येथील आदिवासींची जमीन बेकायदेशीररित्या बळकावून आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रदीप पवार यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मंगळवारी हिंदु महादेव कोळी समाज व आदिवासी बांधव यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या बाबतचे निवेदनही आंदोलकांनी जिल्हा प्रशासनास दिले. मौजे लहांगेवाडी येथील गट क्रमांक ४९० या जमिनीवर चार आदिवासी कुटूंबीय गेल्या ७० वर्षांपासून जमीन कसत आहेत. त्या संदर्भात महसुल विभागाकडे नोंदी आहेत. ही जमीन आदिवासी कुटूंबियांच्या कब्जा व वहिवाटीत असून त्यावर चार कुटूंबे हंगामी पिके घेऊन आपली उपजिविका भागवतात. असे असताना या जमिनीवर डॉ. पवार यांनी दंडेलशाहीचा वापर करत त्यांना तेथून बेघर केले. तसेच कुटूंबातील महिलांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत डॉ. पवार यांच्याविरुद्ध अनूसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी संबंधित आदिवासी, कोळी समाजबांधवांनी केली आहे. पोलिसांकडे वारंवार दाद मागुनही कारवाई केली जात नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. पोलीस कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली. या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संबंधितांनी दिला आहे.