आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघाच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘बोंबाबोंब’ मोर्चा काढण्याचा इशारा संघाचे सरचिटणीस जी. जी. चव्हाण यांनी दिला आहे.
पंचवटीतील नवीन आडगाव नाक्याजवळून सकाळी १० वाजता निघणारा हा मोर्चा पंचवटी कारंजा, महात्मा गांधी रस्ता, शालिमार चौक, आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. मोर्चात आदिवासी दलित, अल्पसंख्याकांसह विविध भटक्या व विमुक्त जाती जमातीतील लोक सहभागी होणार आहेत.
मोर्चाचे नेतृत्व जी. जी. चव्हाण, माजी खासदार सुधीर सावंत, नगरसेवक दिनकर पाटील हे करणार आहेत.
संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये भटक्या व विमुक्त जाती जमातीतील प्रत्येकाला शासनाने घर तसेच पाच गुंठा भूखंड द्यावा, पिवळी शिधापत्रिका द्यावी, जातीचे दाखले देण्यासाठी मागील साठ वर्षांचे पुरावे मागू नये, क्रीमीलिअरची अट रद्द करावी, दारिद्य््रारेषेखालील कुटुंबांसाठी मिळणाऱ्या पिवळ्या शिधापत्रिकेसाठी १५ ते २० हजार रुपयांच्या उत्पन्नाची अट रद्द करावी, भटक्या विमुक्त जातीतील प्रत्यक्ष रहिवाशांच्या वाडय़ा, वस्तीवर पाहणी करून निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र देण्यात यावे, भटक्या विमुक्तांच्या समाजप्रमुखाच्या शिफारशी पत्रानुसार जातीचे दाखले द्यावेत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ही योजना ग्रामीणप्रमाणे शहरी भागातही लागू करावी, राजकीय आरक्षणासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवावेत, पारधी पुनर्वसन योजनेखाली महाराष्ट्रातील सर्व पारधी कुटुंबांना योजनेचा फायदा द्यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.