भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने एटापल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या आदिवासी मेळाव्यातील आदिवासी बांधवांना रेशन दुकानातील निकृष्ट तांदळाचा मसालेभात देण्यात आला, तर अधिकाऱ्यांसाठी मात्र गोड पदार्थाची शाही मेजवानी देण्यात आल्याने आदिवासींच्याच उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना आदिवासींबद्दल किती आपुलकी आहे, हे दिसून आले.
एटापल्लीतील या जनजागरण मेळाव्याला अहेरीचे अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, प्रकल्प अधिकारी सोनकवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नलावडे, तहसीलदार इंगवले, संवर्ग विकास अधिकारी बोरावार, पंचायत समितीच्या सभापती ललिता मट्टामी आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यात कन्यादान सोहळा, आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. मेळाव्यानिमित्त आदिवासी बांधवांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मेळाव्यासाठी १८ मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, व्यासपीठावर फक्त  ८ खुच्र्या ठेवण्यात आल्या होत्या. इतर मान्यवरांना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात न आल्याने काही मान्यवर मेळाव्यातून निघून गेले.
मेळाव्यात आदिवासी बांधवांसाठी सामूहिक भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्यासाठी रेशन दुकानातील तांदूळ आणून मसालेभात तयार करून पत्रावळीत देण्यात आला. मात्र, तो खाण्यायोग्य नसल्याने अनेकांना जेवण न करता निघून जावे लागले. याच कार्यक्रमात अधिकाऱ्यांसाठी शाही मेजवानी आयोजित करण्यात आली होती. हे बघून काही आदिवासी बांधवांनी अधिकाऱ्यांच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला. आदिवासी विभागातील  अधिकारीच आदिवासींना कमी लेखतात, हे या प्रकारवरून दिसून आले. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी बांधव करत आहेत.