उरणमधील चिरनेरच्या रानसई आदिवासी वाडीतील सात पाडय़ांच्या गावांतील आदिवासी ग्रामस्थ महावितरणकडून हजारो रुपयांची वीज देयके हातात पडत असल्याने हैराण झाले आहेत. यामुळे वीज देयके न भरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मागील अनेक महिन्यांपासून वीज बिले न भरल्याने महावितरणने या गावातील पन्नास घरांची वीज तोडली आहे. विजेचा वापर कमी असताना इतकी भरमसाट बिले कशी, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित करीत, तहसीलदार आणि महावितरणे पाडय़ाची पाहणी करून वीज बिले कमी करावीत तरच बिल भरणा करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. थकीत बिले भरा नंतर पुढचे पाहू, असा पवित्रा महावितरण घेतला आहे. उरण शहरापासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या रानसई या आदिवासी वाडीत वीज पोहोचली आहे. असे असले तरी आदिवासी योजनेतून विजेचे कनेक्शन घेतलेल्या आदिवासींना अव्वाच्या सवा वीज बिले आल्याने अनेकांच्या थकबाकीत वाढ झालेली आहे. या थकबाकीचे कारण पुढे करून उरणच्या महावितरण कंपनीने कारवाई करीत येथील घरांची वीज तोडली आहे. अनेकांना वीज न वापरताच भरमसाट बिले आलेली असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य शिंगवा यांनी सांगितले. त्यामुळे वीज बिले कमी केल्यास आम्ही बिले भरण्यास तयार असल्याने तहसील विभागाने मध्यस्थी करून महावितरणला रानसईमधील वीज पूर्ववत सुरू करण्याची मागणी आपण करणार असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली. या संदर्भात उरण विभागाचे महावितरणचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी थकीत बिले भरल्याशिवाय वीजजोडणी करणे शक्य नसल्याचे सांगितले.