कलाकारांच्या मनात आदराची भावना असल्याने मुंबईतील अनेक कलाकारांनी नुकतीच या नेत्याला सांगीतिक श्रद्धांजली अर्पण केली. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात ‘जमलेल्या माझ्या तमाम..’ या शीर्षकाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर यांनी केले होते. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्यापासून आजची आघाडीची गायिका वैशाली सामंत हिच्यापर्यंत नव्या-जुन्या पिढीतील असंख्य कलाकार यात सहभागी झाले होते.
बाळासाहेब स्वत: कलावंत आणि कलाप्रेमी होतेच. परंतु, अनेक तरुण, नवोदित, प्रस्थापित अशा सर्व कलाकारांबद्दल त्यांना जिव्हाळा होता. चित्र, शिल्प, चित्रपट, नाटक, संगीत इत्यादी क्षेत्रातील कलावंतांना बाळासाहेबांच्या दिलखुलास भेटींचा अनुभव आहे. हा अनुभव घेतलेल्या अनेक कलाकारांनी यावेळी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. यशवंत देव यांनी सांगितले की, ‘पूर्वी बाळासाहेब आमच्या समोरच राहात होते, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व खूप जवळून अनुभवता आले. दिग्गज कलावंत आणि समाजाभिमुख राजकारणी, हे त्यांचे वैशिष्टय़ होते.’ मंगेश पाडगावकर यांनी यावेळी त्यांची ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ही कविता वाचून दाखवली. बाळासाहेबांनी कलाकारांना नेहमीच प्रेमळ वागणूक दिली, ते प्रेम वाटत गेले, त्यामुळेच ही कविता सादर केल्याचे त्यांनी सांगितले. ‘साहेब माझ्या आवाजाचे चाहते होते, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा अनुभव वेगळाच असे. माझी अनेक गाणी त्यांची आवडती होती’, असे सांगत सुरेश वाडकर यांनी ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘काळ देहासी आलो खाओ’ आणि दयाघना’ ही गाणी सादर करून रसिकांची मने जिंकली. ज्येष्ठ पाश्र्वगायिका अनुराधा पौडवाल यांची उपस्थितीही लक्षणीय ठरली. त्यांनी ‘हे राम, हे राम’ हे गाणे गाऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली तर पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी ‘निश्चयाचा महामेरू’ ही शिवस्तुती म्हटली.
रवींद्र साठे, उपेंद्र भट, सुदेश भोसले, अशोक मुळ्ये, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, भाऊ मराठे, सुधीर सिन्हा आदी अनेक कलावंतांनीही गाणी सादर केली तसेच बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. ‘जाणता राजा’ या महानाटय़ाच्या कलाकारांनी यावेळी ‘अफजलखान वधा’चा प्रवेश सादर करुन टाळ्या वसूल केल्या. स्मिता गवाणकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.      
दानशूर पाठिराखा
१९९२मध्ये ‘जीवनगाणी’च्या ५०व्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेल्या बाळासाहेबांना आपण वृद्धाश्रमासाठी पाच हजार रुपयांची थैली दिली, मात्र मी कलाकारांकडून देणगी घेत नाही, असे सांगत बाळासाहेबांनी ती थैली परत केली, उलटपक्षी आमच्या संस्थेला २५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली व दुसऱ्या दिवशी ती रक्कम दिलीही, त्यांच्या त्या आशीर्वादाच्या आधारेच आमची वाटचाल सुरू आहे, अशी भावना प्रसाद महाडकर यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांवरील प्रेमापोटी या कार्यक्रमातील सर्व कलाकार कोणत्याही मानधनाशिवाय सहभागी झाले होते, साहजिकच रसिकांनाही या कार्यक्रमात विनामूल्य प्रवेश देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.