उरण तालुक्यातील बोकडविरा गावातील दामोदर काळू ठाकूर ऊर्फ दामुअण्णा यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मुंबईत राहून रायगड जिल्ह्य़ातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील शेकडो ग्रामीण रुग्णांना मोफत रुग्णसेवा दिली आहे. ४५ वर्षांपूर्वी ही रुग्णसेवा करून त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. रुग्णांना मोफत आरोग्य सेवा पुरविणारा पडद्याआडचा समाजसेवक म्हणून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
१९७० च्या दशकात रायगड जिल्ह्य़ातील रायगड जिल्हा हा ग्रामीण भागात मोडणाराच जिल्हा होता. या जिल्ह्य़ात रुग्णावरील उपचाराची सोय नव्हती. त्यामुळे क्षयासारखा आजार झाल्यास घरात उपचाराविनाच अनेक जणांचे मृत्यू होत होते. दामुअण्णा यांनी शिवडीच्या क्षय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सहकार्याने उरण तालुक्यातील फुंडे,बोकडविरा तसेच चिरनेर गावात आरोग्य शिबिरे आयोजित करून शेकडो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. १९७२ साली क्षयरोग चिकित्सक डॉ. एम. डी. देशमुख यांनी दामुअण्णा यांना उरण तालुक्यातील क्षयरोग तसेच इतर आजारांवरील मोफत औषधे पुरवठा करण्याची जबाबदारीच सोपविली होती. तसेच या कामाबद्दल त्यांना प्रमाणितही केले होते. महाराष्ट्र राज्य क्षयरोग निवारण संस्थेच्या वतीने छोटे रोगनिदान, बी. सी. जी. मोहीम राबवून उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल १९७७ साली दामुअण्णांना सन्मानित करण्यात आलेले होते. मात्र त्यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही प्रकारे समाजसेवक म्हणून दावा केला नाही. सातत्याने ते पडद्याआड राहून गोरगरीब रुग्णांच्या सेवेचे काम करीत राहिले, तसेच शेवटपर्यंत काम करूनही पडद्याआडच राहिले. हेच त्यांचे मोठेपण होते, असा शब्दांत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनानंतर विविध थरांतून त्यांच्या या कार्याचा गौरव केला जात आहे.