मराठवाडय़ातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना उतरण्याची सोय व्हावी यासाठी हज हाउस उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मंगळवारी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे नगरसेवक अमित भुईगळ आणि कार्यकर्त्यांनी ‘ही जागा हज हाउससाठी राखीव आहे’ असे फलक तयार करून जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. बेगमपुरा पोलीस ठाण्यात भारिप कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना सोडावे, या मागणीसाठी सायंकाळपर्यंत कार्यकर्त्यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.
औरंगाबाद येथील नगर भूमापन क्रमांक ६६५६ मधील दोन एकर जागा हज हाउससाठी मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. त्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी महसूल व वन विभागाकडे पाठविलेला आहे. याच भागात ‘वंदे मातरम् सभागृह’ व्हावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, वंदे मातरम् सभागृह वेगळ्या सव्‍‌र्हे क्रमांकामध्ये आहे. त्यास आमचा विरोध नाही. हज हाउससाठी दिलेल्या जागेवर ते उभे राहावे, या मागणीसाठी नगरसेवक भुईगळ व कार्यकर्त्यांनी दुपारी ताबा मिळवला. ‘जागा हज हाउससाठी नियोजित आहे’, अशी पाटी रोवली. ही माहिती कळताच शहर पोलीस घटनास्थळी आले. दरम्यान, बघ्यांची गर्दी वाढली होती. पोलीस येताच काही जण पळाले. तर कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.राष्ट्रवादी काँग्रेसनेही हज हाउसच्या मागणीस पाठिंबा देत सोमवारी विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन केले. तर काही मुस्लीम संघटना व कार्यकर्ते याच मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. या मागणीच्या अनुषंगाने होणाऱ्या वेगवेगळ्या घटनाक्रमांची माहिती पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली जात आहे. या अनुषंगाने शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना विचारले असता, हज हाउससाठी विरोध नाही. तथापि, राष्ट्रपतींच्या हस्ते जेथे वंदे मातरम् सभागृहाचे भूमिपूजन झाले होते, तेथेच ते सभागृह झाले पाहिजे, अशी भूमिका आहे. २८ तारखेपर्यंत सरकारने ही जागा ताब्यात दिली नाही, तर शिवसैनिक त्या जागेचा ताबा घेतील. दरम्यान, हज हाउसच्या मागणीच्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे पोलिसांची दमछाक होत आहे.