आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महापालिकेच्यावतीने विशेष प्रयत्न होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्र्यंबक रस्ता वाहतूक बेटांसह शोभिवंत करण्याचा संकल्प करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तथापि, दीड महिने उलटूनही हे काम पुढे सरकलेले नाही. पहिल्या टप्प्यातील कामास सुरूवात झाली नसल्याने इतर मार्ग व वाहतूक बेटांचे सुशोभीकरण कसे होणार, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
शहर सुशोभिकरणाच्या पहिल्या टप्प्यात त्र्यंबक नाका सिग्नल ते सातपूर येथील चौकापर्यंतच्या दुभाजकात शोभिवंत झाडे लावून त्र्यंबक रस्त्याचे रुपडे पालटण्याचे महापालिकेने जाहीर केले. या रस्त्याच्या सुशोभीकरणाचे प्रायोजकत्व संदीप फाऊंडेशनने स्वीकारले आहे. रस्त्याच्या सुशोभीकरणासोबत शासकीय रुग्णालयालगतचा परिसर शोभिवंत झाडांनी सुशोभित केला जाणार आहे. जून महिन्यात या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. रस्ता दुभाजक सुशोभिकरणात त्र्यंबक सिग्नल ते जलतरण तलाव सिग्नलच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करून जुलैपर्यंत ते पूर्णत्वास नेले जाणार असल्याचे महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनी म्हटले होते. परंतु, आजतागायत म्हणजे ऑगस्टच्या मध्यापर्यंत हे काम पूर्ण होणे तर दूर, पण त्यास सुरूवात देखील झालेली नसल्याचे दिसते. त्यामागील कारण जाणून घेण्यासाठी महापौरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.
जिल्हा रुग्णालय, मुंबई नाका महामार्ग बसस्थानकालगतच्या वाहतूक बेटांसह ३० वाहतूक बेटांचे प्रायोजकांच्या मदतीने सुशोभीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पुढील टप्प्यात प्रायोजक लाभल्यास २० बेटांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. वाहतूक बेटांच्या सुशोभिकरणात प्रथमच वेगळे तंत्र वापरले जात असल्याने ते वाहतुकीस अनुकूल ठरतील. त्यासाठी पालिकेने प्रथम संबंधित चौकात वाहतुकीची घनता कशी आहे, कोणत्या बाजुने अधिक वाहने येतात, याचा छायाचित्रणाद्वारे अभ्यास करून आराखडे तयार केले आहेत. त्या अंतर्गत जून महिन्यात संदीप फाऊंडेशन व महापालिकेने त्र्यंबक रस्त्याचे सुशोभिकरणाच्या कामाचा श्रीगणेशा केला. परंतु, आजतागायत हे काम सुरू झाल्याचे दिसत नाही.