News Flash

दप्तराच्या ओझ्याला ट्रॉली बॅगचा पर्याय..

कोवळ्या वयात भरगच्च दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याला त्यांच्या पालकांनीच ट्रॅव्हल्स ट्रॉली बॅगचा पर्याय शोधून काढला असून अनेक विद्यार्थी शाळा बसमधून उतरल्यानंतर

| January 15, 2015 06:37 am

कोवळ्या वयात भरगच्च दप्तराचे ओझे घेऊन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्याला त्यांच्या पालकांनीच ट्रॅव्हल्स ट्रॉली बॅगचा पर्याय शोधून काढला असून अनेक विद्यार्थी शाळा बसमधून उतरल्यानंतर या दप्तरांच्या ट्रॉली बॅग खेचत घरी किंवा वर्गात जाताना दिसून येत आहेत. त्यामुळे या ट्रॉली बॅगच्या किमतीदेखील चांगल्याच वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे या बॅगा घेणे सर्वानाच शक्य नाही. मराठी, इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिवसेंदिवस वाढणारे दप्तरांचे ओझे हा दीर्घकाळ चर्चेत असणारा विषय असून अनेक लोकप्रतिनिधी, संस्था हे ओझे कमी करण्याचा आग्रह सरकारकडे अनेक वर्षे करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे ओझे त्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असता कामा नये, असे डॉक्टरांचे मत आहे. मात्र हे ओझे आता ३५ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी दप्तराचे हे ओझे घेऊन वाकत चालत असल्याचे दिसून येते. जास्त वजनामुळे काही विद्यार्थ्यांना पाठीच्या कण्याच्या समस्या सतावत आहेत. किरकोळ शरीरयष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना हा त्रास अधिक भेडसावत आहे. त्यावर उपाय म्हणून अनेक पालकांनी दप्तरांचे ओझे वाहू शकतील अशा ट्रॅव्हल्स बॅग खरेदी केल्या असून विद्यार्थी त्या शाळेत ये-जा करताना वापरत असल्याचे दिसून आले. ऐरोलीतील डीएव्ही स्कूलचे माजी मुख्याध्यापक राजीव गुप्ता यांनी या बदलत्या ट्रॅव्हल्स ट्रॉली दप्तराला दुजोरा दिला. शिक्षकांनी कमी वह्य़ा-पुस्तके आणण्यास सांगितले तरी काही विद्यार्थी सर्व पुस्तकांचे ओझे नेहमी वाहत असल्याचे दिसून येते असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी या ट्रॅव्हल्स ट्रॉली बॅग वापरत असल्याने त्यांच्या किमती आता एक हजारापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थ्यांकडून या छोटय़ा बॅगांना आता मागणी वाढू लागल्याचे रमेश पुरोहित या व्यापाऱ्याने सांगितले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे ओझे पहावत नसल्याचे स्पष्ट करून आपण आपल्या मुलीला अशी बॅग घेऊन दिल्याचे योगेश चव्हाण या पालकाने स्पष्ट केले. अलीकडे शाळांच्या बसेस सोसायटीच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असल्याने या ट्रॉली बॅगा खेचत नेणे सोयीचे होत आहेत. अनेक शाळांच्या बसेस त्यांच्या आवारातच उभ्या केल्या जात असल्याने तेथून विद्यार्थी ही ट्रॉली बॅग मोठय़ा आवडीने खेचत नेत असल्याचे दिसून येते. नेरुळ, बेलापूर, वाशी, ऐरोली येथील सीबीएसई तसेच आयसीएसई शाळांमध्ये या ट्रॅव्हल्स ट्रॉली बॅग खेचणारे विद्यार्थी जास्त प्रमाणात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 6:37 am

Web Title: trolley bag new option for school bags in mumbai
टॅग : School Bags
Next Stories
1 पाणी चोरीत नेत्यासह पालिका अधिकाऱ्यांचे हात ओले
2 पनवेलमधील रिक्षा मीटरसक्ती गारठली
3 संक्रांतीसाठी बाजारपेठ गजबजली
Just Now!
X