शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन व महावीर प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा भारती विद्यापीठाच्या (पुणे) ‘उलागड्डी’ या एकांकिकेने जिंकली. जिल्हा पातळीवरील प्रथम पारितोषिक मल्हार रंगमंचच्या (नगर) ‘हिय्या’ या एकांकिकेला मिळाले. हीच एकांकिका एकुणात दुसरीही आली.
स्पर्धेचे पारिताषिक वितरण रविवारी सायंकाळी प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते झाले. खासदार दिलीप गांधी, महापौर संग्राम जगताप, आशाताई फिरोदिया, नरेंद्र फिरोदिया, विक्रम फिरोदिया, नमिता फिरोदिया, राखी फिरोदिया, आशिष पोकर्णा, ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक केदार शिंदे, सुजय डहाके, स्वप्नील मुनोत, हर्षल बोरा आदी या वेळी उपस्थित होते.
स्पर्धेतील पहिले ६१ हजार रुपये आणि महाकरंडकाचे पारितोषिक भारती विद्यापीठाच्या ‘उलागड्डी’ या एकांकिकेला मिळाले. अन्य पारितोषिके पुढीलप्रमाणे आहेत. द्वितीय (४१ हजार रुपये, करंडक)- हिय्या (मल्हार रंगमंच, नगर), तृतीय (२१ हजार रुपये, करंडक)- क ला काना का (एमआयटी, पुणे) आणि चतुर्थ (११ हजार रुपये, करंडक)- ओश्तोरीज (जोशी-बेडेकर महासंघ, मुंबई).
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. सवरेत्कृष्ट विनोदी एकांकिका- स्क्वेअर वन (पायनापल क्रिएशन, पुणे), उत्तेजनार्थ एकांकिका- पाणीपुरी (ऋतुरंग, नाशिक). दिग्दर्शन- उलागड्डी (प्रथम), ओश्तोरीज (द्वितीय) आणि क ला काना का (तृतीय). पुरुष अभिनय- हिय्या (प्रथम), उलागड्डी (द्वितीय) आणि रेनमेकर (तृतीय, अश्वमेध, नाशिक). स्त्री अभिनय- उलागड्डी (प्रथम), तन्वी कुलकर्णी (द्वितीय- चॉकलेटचा बंगला, गरवारे कॉलवे पुणे) आणि क ला काना का  (तृतीय). सहायक अभिनेता- यतीन माझिरे (प्रथम, अठरावा उंट, संक्रमण, पुणे), अल्पविराम (रोटरी, चिपळूण). सहायक अभिनेत्री- अल्पविराम (प्रथम) आणि सविता मालपेकर (द्वितीय- इच्छा, नाटय़मंडळ, पुणे).
लेखन- अभयसिंह जाधव (प्रथम- क ला काना का), शिवराज वायचळ (द्वितीय- उलागड्डी). रंगभूषा व वेशभूषा- सुप्रिया जाधव (प्रथम- ओश्तोरीज), अनंत रिसे (द्वितीय- सांबरी, नाटय़ आराधना, नगर). प्रकाश योजना- भूषण देसाई (प्रथम- ओश्तोरीज), शुभंकर सौंदणकर (द्वितीय- उलागड्डी), श्रीकांत हेबळे (तृतीय- वाचलेली ऐकलेली, रंगसाधना, नगर). नेपथ्य- उलागड्डी (प्रथम), ओश्तोरीज (द्वितीय) आणि पाणीपुरी (तृतीय).
 नाटय़गृहाची उणीव
कार्यक्रमात भरत जाधव यांनी नगर शहरात परिपूर्ण नाटय़गृहाची उणीव असल्याचे सांगून त्याबद्दल खेद व्यक्त केला. या भव्यदिव्य स्पर्धेच्या संयोजनाबद्दल त्यांनी फिरोदिया कुटुंबीयांचे कौतुक केले. स्पर्धेतील करंडकाच्या नावाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. नाटय़गृहाबद्दल पुनरावृत्ती करताना केदार शिंदे यांनी शहरात नव्याने चांगले नाटय़गृह झाल्यास उद्घाटनासाठी कलाकारांची मांदियाळी येथे भरवू असे आश्वासन दिले. खासदार गांधी, महापौर जगताप यांचीही या वेळी भाषणे झाली. निनाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल खोले यांनी आभार मानले.