मालमोटारीची धडक बसून मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील वर्दळीच्या बाबा पेट्रोलपंप चौकात शनिवारी रात्री उशिरा घडली. दीपक गोपाळराव भावे (वय ५४, एन ११, औरंगाबाद) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. हिरो होंडा स्प्लेन्डर मोटारसायकलवरून भावे हे रेल्वे स्टेशनहून मध्यवर्ती बसस्थानकाच्या दिशेने जात होते. लोखंडी सळ्या घेऊन जालना रस्त्याने नगर नाक्याच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या मालमोटारीने (एमएच ४ पी ५२१६) मोटारसायकलला (एमएच २० एके ८२५३) चौकात उडविले. रात्री सव्वाअकराच्या दरम्यान हा प्रकार घडला. अपघातानंतर मालमोटार तेथेच सोडून चालक पळून गेला. क्रांती चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भाऊसाहेब कुंटे यांनी फिर्याद दिली.