ठाणे शहरापाठोपाठ आता संपूर्ण मुंब्रा परिसराचाही जीआयएस (जॉग्राफिकल इन्ऱ्फॉर्मेशन सिस्टीम) प्रणालीद्वारे सव्‍‌र्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असून त्यामध्ये मुंब्रा भागातील इमारती, त्यामधील रहिवासी, अशी इत्थंभूत माहिती संकलित करण्यात येणार आहे. या सव्‍‌र्हेक्षणाला पुढील आठवडय़ात सुरुवात होणार असून येत्या एक ते दीड महिन्यात सव्‍‌र्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मुंब्रा परिसरात वारंवार होणाऱ्या इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर शहरातील धोकादायक तसेच अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट महिनाभरात करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने इमारतधारकांना दिल्या असून त्यासंबंधीच्या नोटिसा त्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
गेल्या सहा महिन्यांत मुंब्रा परिसरात अनधिकृत इमारती कोसळल्या असून त्यामध्ये शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ठाणे शहरासह मुंब्रा परिसरात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत इमारती असून त्यात रहिवासीही मोठय़ा प्रमाणात वास्तव्य करीत आहेत. मध्यंतरी, महापालिका प्रशासनाने वारंवार घडणाऱ्या इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर धोकादायक तसेच अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये त्यांना घरे खाली करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. मात्र, या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा मगच इमारतींवर कारवाई करा, अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घेऊन आंदोलने केली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारवाईत अडथळे निर्माण झाले होते. दरम्यान, ठाणे शहरासह मुंब्रा विभागात क्लस्टर डेव्हलमेंटची योजना राबवावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष आग्रही आहेत. असे असले तरी याबाबत राज्य शासन मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
क्लस्टर डेव्हलमेंट तसेच अन्य पुनर्वसनासंबंधीच्या योजना राबविण्यासाठी जीआयएस प्रणालीचे सव्‍‌र्हेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. मध्यंतरी, ठाणे शहरात अशा प्रकारचा सव्‍‌र्हे करण्यात आला आहे. मात्र, मुंब्रा परिसरात अशा प्रकारचा सव्‍‌र्हे करताना काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे हा सव्‍‌र्हे पूर्ण होऊ शकला नव्हता. मुंब्रा परिसरात इमारत कोसळण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. त्याच पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मुंब्रा परिसराचाही जीआयएस (जॉग्राफिकल इन्ऱ्फॉर्मेशन सिस्टीम) प्रणालीद्वारे सव्‍‌र्हेक्षण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या वृत्ताला महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी दुजोरा देत पुढील आठवडय़ात हा सव्‍‌र्हे सुरू करण्यात येणार असून एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या पाश्र्वभूमीवर गुरुवारी महापालिका अधिकारी, नगरसेवक आदींची बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील धोकादायक तसेच अनधिकृत इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट महिनाभरात पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचना इमारतधारकांना नोटीसद्वारे देण्यात येत आहे. तसेच महिनाभराची मुदत संपल्यानंतरच पुढील कारवाईसंबंधी निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.