आठवलेंनी सोडून दिलेल्या राजकीय वाटेवर आता उमटणार प्रकाश आंबेडकरांची पावले
आपल्या पक्षाचा व स्वत:चाही काहीच फायदा होत नाही म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या तिसऱ्या राजकीय आघाडीची जमवाजमव आता भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सुरू केली आहे. उद्या ५ व ६ जानेवारीला पुण्यात डाव्या-पुरोगामी पक्ष संघटनांच्या बैठकीत नवी राजकीय आघाडी स्थापन करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रामदास आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार रिपब्लिकन पक्षाचे विविध गट, कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, समाजवादी पक्ष तसेच इतर काही संघटनांना सोबत घेऊन रिडालोस नावाची तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली होती. या आघाडीच्या वतीने २००९ च्या विधानसभेच्या निवडणुका लढविण्यात आल्या. त्यात इतर पक्षांचे काही उमेदवार निवडून आले. परंतु आरपीआय वा आठवले यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आठवले यांनी रिडालोसला वाऱ्यावर सोडून थेट शिवसेना-भाजपच्या कळपात उडी मारली. परिणामी रिडालोसचा प्रयोगही मोडीत निघाला.
आठवले यांनी सोडून दिलेला तिसऱ्या राजकीय आघाडीची उभारणी करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी आता सुरू केला आहे. यासंदर्भात आंबेडकर यांच्या पुढाकारानेच मुंबईत ३ डिसेंबरला बैठक घेतली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता उद्या ५ जानेवारी व परवा ६ जानेवारीला अशी दोन दिवस पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला भारिप बहुजन-महासंघ, सत्यशोधक मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, भाकप, माकप, लाल निशाण पक्ष, मूव्हमेंट फॉर पीस अ‍ॅंड जस्टिस, शिक्षक संघटना, रिपब्लिकन पॅॅंथर इत्यादी पक्ष-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रकाश आंबेडकर यांचा तिसरा राजकीय पर्याय उभा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. रामदास आठवले भाजप-शिवसेनेबरोबर गेल्यामुळे आंबेडकर यांची नवी राजकीय भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.