लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता मित्रपक्षाला प्रचारात सहभागी करून घेण्याचे व त्याचे रुसवे फुगवे दूर करण्याचे मोठे आव्हान महायुती आणि आघाडीच्या उमेदवारांपुढे उभे ठाकणार आहे. विदर्भातील लोकसभेच्या १० जागांवर खरी लढत भाजप-सेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतच आहे.
स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकांमध्ये हे पक्ष परस्परांच्या विरोधात शड्डू ठोकत असल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्येही कमालीचे अंतर निर्माण झालेले असते. भाजपच्या नेत्यांनी मनसे प्रमुखांची भेट घेतल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे शिवेसेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली असून त्याचा परिणाम महायुतीवर झाला आहे. नव्याने स्थापन झालेला आम आदमी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार मैदानात असले तरी त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता लढाई ही दोन पक्षात बघायला मिळण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभू्मीवर मित्रपक्षाच्या नेत्यांना प्रचारात सहभागी करून घेताना उमेदवारांचा घाम निघणार आहे.
लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेस नागपूर, रामटेक, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि वाशीम या जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा, भंडारा आणि अमरावतीची जागा राष्ट्रवादीने रिपाइंसाठी सोडली आहे. भाजप-सेना युतीत बुलढाणा, अमरावती, वाशीम-यवतमाळ आणि रामटेक शिवसेना तर वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जागेवर भाजपचे उमेदवार रिंगणात राहणार आहेत. बुलढाणा, भंडाऱ्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची तर नागपूर, वर्धा, रामटेक, गडचिरोली, अकोला आणि वाशीम येथे काँग्रेसला राष्ट्रवादीची गरज भासणार आहे. बुलढाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वाद पारंपरिक आहेत. या मतदारसंघातून सातत्याने शिवसेनेला विजयी होण्यासाठी मिळालेली ‘शक्ती’ कोणाची होती हे लपून राहिले नाही.
भंडाऱ्यातून काँग्रेसला संपवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल कारणीभूत असल्याचा आरोप या भागातील आमदार आणि स्थानिक नेते करतात. काँग्रेसमधून बाहेर पडलेले नाना पटोले यांचे मोठे आव्हान पटेलांसमोर आहे. शिवाय काँग्रेसचा एक नाराज असलेला गट पटोले यांच्या पाठिशी आहे. गोंदियातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीने काँग्रेसला सोबत घेतले नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारात भंडारा जिल्ह्य़ातून कोँग्रेसला प्रतिनिधित्व मिळाले नाही, हा सर्व राग या निवडणुकीत निघण्याची शक्यता आहे. या नेत्यांना प्रचारात कशा पद्धतीने समावून घेणार, यात पटेल यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना राष्ट्रवादीची  मदत घ्यावी लागणार आहे. शहरात राष्ट्रवादीची शक्ती मर्यादित आहे. राष्ट्रवादीचे आठही नगरसेवक मेघे समर्थक आहेत आणि मेघे सध्या काँग्रेसमध्ये असल्याने मुत्तेमवारांना अडचण जाणार नाही. पण राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे मुत्तेमवार विरोधक म्हणून ओळखले जातात. मुत्तेमवार त्यांना कसे सोबत घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, माजी अनिस अहमद यांची  मुत्तेमवार विरोधात असलेली नाराजी उघड आहे. मुत्तेमवार यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये यासाठी राष्ट्रवादीने दिल्ली दरबारी फिल्डिंग लावली होती मात्र त्यात ते यशस्वी झाले नाही.
 रामटेक लोकसभा मतदारसंघातील काटोल विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे. पक्षाचे आमदार व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. गेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली होती. येथे मुकुल वासनिकांना आता देशमुखांना सोबत घ्यावे लागणार आहे. शिवाय सावनेरमध्ये सुनील केदार यांची वासनिक यांच्यावर नाराजी बघता त्यांना विश्वासात घेणे वासनिकांना जिकिरीचे ठरणार आहे.
वर्धामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे चिरंजीव सागर मेघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मेघे यांनी पवारांची साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस मनाने त्यांच्यासोबत राहण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस आणि रणजित कांबळे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या त्यांच्या समर्थकांनाही कामाला लावण्यासाठी मेघेंना प्रयत्न करावे लागणार आहेत.
अकोल्यामध्ये संजय धोत्रे यांना नाराज असलेल्या पांडुरंग फुडकर यांना विश्वास घ्यावे लागेल. शिवाय महायुतीमध्ये असलेल्या नेत्यांचा धोत्रे यांना विरोध बघता त्यांना यावेळी बरीच मेहनत घेणे आवश्यक आहे. अकोल्यात गेल्यावेळी बाबासाहेब धाबेकर यांच्याऐवजी हिदायत पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी कितपत सहकार्य करेल, याबाबत काँग्रेसचे नेते साशंक आहेत. स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीचे कधीच काँग्रेसशी जुळले नाही. जिल्ह्य़ात राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकत्रित करताना पटेलच्या नाकी नऊ येणार आहेत. यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे अस्तित्व संपुष्टात येऊन वाशीम-यवतमाळ मतदारसंघ अस्तित्वात आल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. ही जागा काँग्रेसने जिंकली तर राष्ट्रवादीला त्यावर पुढे दावा करता येणार नाही, त्यामुळे राष्ट्रवादीची या मतदारसंघातील रणनीती वेगळी राहू शकते. गडचिरोलीवरही राष्ट्रवादीने दावा केला होता. मात्र, मतदारसंघ काँग्रेसला सुटल्याने राष्ट्रवादीचे नेते विरोधात आहेत. आघाडीप्रमाणेच भाजप-सेना युतीतही मतभेद आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपानंतर भाजपाचे नेते नितीन गडकरी आणि विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची घेतलेली भेटीमुळे संबंध ताणले गेले आहे. युतीमधील या दोन पक्षामुळे महायुती संपुष्टात येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांची मने सध्या काही जुळली नाहीत, हे त्यांच्या वक्तव्यांवरून वारंवार स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर मित्रपक्षाला सुटलेल्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षाची भूमिका काय राहते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. बुलढाणा, अमरावती, रामटेक आणि वाशीम या सेनेकडील मतदारसंघात भाजपची शक्ती लक्षणीय
आहे. भाजपाकडे असलेल्या मतदार संघात
सेनेची भूमिका काय राहाते याकडे लक्ष लागले
आहे.