मुंबईतील कल्याणहून पतीशी भांडून आलेल्या तरुणीचे ऊसतोडीच्या कामावर लावतो म्हणून अपहरण करण्याचा प्रयत्न मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे दक्ष नागरिकांच्या हस्तक्षेपाने उधळला गेला. अपहरणकर्त्यां दोघांना नागरिकांनी जीपसह पोलिसांच्या हवाली केली.
    ज्योती राजू उर्फ सिकंदर शेख (वय ३०) ही तरुणी कल्याणहून पतीशी वाद करून जगण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकावर आली होती. रविवारी सकाळी उत्तम दत्तू नाईक (५५, रा. शिपूर) व जगन्नाथ बाबूराव मलमे (४४, रा. कवलापूर) या दोघांनी तिला ऊस तोडीच्या कामावर लावतो म्हणून जीप (एम एच ११ एफ १४१९) मधून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.  म्हैसाळ रोडवरील शास्त्री चौक येथे गेल्यानंतर तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न नाईक याने केला. त्यावेळी तिने आरडाओरडा केला.  या संदर्भात अज्ञातांनी पोलीसांना कळविले.  तो पर्यंत सदरची जीप १०  किलोमीटर अंतरावरील म्हैसाळनजीक राजधानी धाब्याजवळ पोहोचली होती.  तेथील नागरिकांना मिरज ग्रामीण पोलिसांनी या घटनेची खबर दिली. त्यावेळी नागरिकांनी जीप अडवून पळवून नेण्यात येत असलेल्या तरुणीची सुटका केली. अपहरणकर्त्यांना जीपसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.