तार चोरीच्या गुन्ह्यात फरार आरोपीने पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोळी पिस्तुलातच अडकल्याने पुढील अनर्थ टळला. आरोपीस पोलिसांनी झडप घालून पकडले. रविवारी रात्री ही घटना घडली.
तालुक्यातील शिरसगाव येथे राहात असलेला आरोपी संजय रावसाहेब चव्हाण हा अट्टल गुन्हेगार आहे. तो सन २०१२च्या रेल्वेच्या तांब्याची तार चोरीच्या गुन्ह्यात आरोपी होता. मात्र तो फरार असल्याने त्याच्यावर न्यायालयाने पकड वॉरंट काढले होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांना तो हवा होता. खबरीवरून उपनिरीक्षक बि. पी. मीना व त्यांच्या पथकाने चव्हाणच्या घराजवळ सापळा लावला होता. सायंकाळी सात वाजता तो घरी आल्यावर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्याने पोलिसांवर पिस्तूल रोखून फायर करण्याचा प्रयत्न केला, मात्र गोळी पिस्तुलातच अडकल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी त्यास झडप घालून जेरबंद केले.
या वेळी केलेल्या चौकशीत त्याने श्रीरामपुरातील एका मोठय़ा गुंडाने हे पिस्तूल दिल्याचे सांगितले. चार दिवसांनी एक व्यक्ती नेवाशाहून श्रीरामपूरला एक कोटी रुपये घेऊन येणार असल्याची टीप त्या गुंडाला मिळाली होती. ते एक कोटी रुपये लुटण्यासाठी चव्हाण यास हे पिस्तूल दिले होते. अशी माहिती चव्हाण याने प्राथमिक तपासात सांगितली. त्याच्याकडून एक चोरीची पल्सर जप्त करण्यात आली आहे.