संपूर्ण जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हजरत मुहम्मद पैगंबर साहेबांची जयंती येत्या मंगळवारी, १४ जानेवारी रोजी साजरी होत असून, त्यानिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. परंतु यंदा ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या काळात ही ईद साजरी होत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर पैगंबर जयंती शोभायात्रेवर पोलिसांनी बंधने लादण्याचा सपाटा लावल्यामुळे शोभायात्रा संयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिद्धेश्वरयात्रा तसेच पंधरा दिवसांपूर्वी शहरात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून पाच तरुणांना ताब्यात घेण्यात आल्याच्या तसेच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा शहरात सलग चार दिवस मुक्काम असल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस प्रशासनासमोर सुरक्षाव्यवस्थेचा ताण पडला आहे. त्यातूनच शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये म्हणून पैगंबर जयंती उत्सवावर बंधने घातली जात आहेत.
शहरात मागील ६० वर्षांपासून पैगंबर जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. शोभायात्रेचा मार्गही ठरलेला आहे. परंतु यंदा शोभायात्रेचा मार्ग बदलावा तसेच विजापूर वेशीत शोभायात्रेचा शुभारंभ व समारोप करताना व्यासपीठ उभारले जाऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून बंधने घातली जात असल्याबद्दल जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटीचे अध्यक्ष रफीक अडते व सरचिटणीस, माजी महापौर खाजादाऊद नालबंद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे स्वत: या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शोभायात्रेचा समारोप होणार आहे. शांततेने निघणाऱ्या या शोभायात्रेवर बंधने लादून पोलीसच वातावरण खराब करीत असल्याचा आरोपही नालबंद व अडते यांनी केला आहे.
विजापूर वेशीतून शोभायात्रेस परंपरेप्रमाणे सुरुवात होऊन नंतर विविध मार्गावरून ती पुन्हा विजापूर वेशीत परत येऊन विसर्जित होणार आहे. यात पवित्र मक्का-मदिनेसह इतर धार्मिक स्थळांच्या नयनरम्य प्रतिकृतींचे दर्शन घडणार आहे. शेकडो रिक्षा व घोडा टांगे तसेच बग्गींसह पैगंबर स्तुतिगीते व नाअत सादर करीत विविध मदरशांतील मुलामुलींचा सहभाग राहणार आहे.