सराफी व्यवसाय करणा-या पितापुत्रावर हल्ला करून त्यांच्याकडील सोन्याचांदीचे दागिने लुबाडण्याचा प्रयत्न फसला. हल्ल्यात पितापुत्र गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोघेही बचावले. हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. गंभीर घटना घडूनही पोलिसांकडे अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच कर्जतमध्ये दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून लुटण्याची घटना घडली होती. अनिल चिंतामणी व ज्ञानेश्वर चिंतामणी अशी हल्ल्यात जखमी झालेल्या पितापुत्रांची नावे आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. संगमनेर शहरालगत घुलेवाडी गावाच्या हद्दीत नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल स्टेटसजवळ काल, शनिवारी रात्री ही घटना घडली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. घुलेवाडी फाटय़ावर असलेल्या चिंतामणी ज्वेलर्सचे मालक अनिल चिंतामणी व त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर हे रात्री दुकान बंद करून मोटारसायकलवरून घरी परत जात असताना, मोटारसायकलवरूनच आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्याकडील दागिन्यांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. चिंतामणींनी प्रतिकार केल्याने पिशवी हिसकावता येत नसल्याचे लक्षात येताच हल्लेखोरांपैकी एकाने ज्ञानेश्वर यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला. ते खाली कोसळताच अनिल यांच्याही तोंडावर वार करण्यात आले. दोघांनाही मारहाण करत हल्लेखोरांनी पिशवी नेण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत ज्ञानेश्वर यांनी आरडाओरड करत तेथून पिशवी घेऊन पळ काढला. आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती ते ओरडून देत होते. त्यामुळे जवळच्याच वसाहतीतील काही नागरिकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. जखमींवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली. घटनेसंदर्भात आज संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. जखमींच्या जबाबासाठी पोलीस गेले, मात्र ते जबाब देण्याच्या स्थितीत नव्हते.