शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळावा अशीच शासनाची भूमिका आहे. विक्री व्यवस्थेतील दलालांची संख्या कमी करण्यात यश आले आहे. कंत्राटी व सामूहिक शेतीचा कार्यक्रम राज्यात सुरू झाला आहे. सर्व बाबींचा विचार करून कृषी विकासाचा दर वाढविण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांना कोले.
तालुक्यातील पिंपळगाव कोंझारा येथे कृषी अवजारांच्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरे काका होते. जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सी. के. मोरे, कॉम्रेड सहाणे मास्तर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, अविनाश थोरात, बापूसाहेब गुळवे, उद्योजक साहेबराव नवले, वसंतराव देशमुख, सरपंच सुरेखा कोकणे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रम राज्यभरात हाती घेतला आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद केली असून गावागावांत शेतक-यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. जिल्हयाच्या पाणीप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले की, धरणांची कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच हे विषय सातत्याने चर्चेत आणले गेले. वरच्या भागाला पाणी द्यायचे की नाही यावरच आपण भांडत राहिलो. त्याचे खापर एकमेकांवर फोडण्याचा कार्यक्रम अजूनही चालू आहे. यामुळेच कित्येक पिढय़ाची आयुष्य वाया गेली. मात्र आता शासनाने पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. साखळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविण्यासाठी मोठा निधी संगमनेरलाही मिळाला आहे. यावेळी संजय देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे याचीही भाषणे झाली.