नाशिक व मालेगाव येथे क्रीडा प्रबोधिनी उभारण्यासाठी आणि उत्तर महाराष्ट्र प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अद्वय हिरे यांनी दिली.        आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करून शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी सक्षम योजना शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत राबवून क्रीडा धोरणात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी मांडले. महात्मा गांधी विद्यामंदीर संस्थांतर्गत येथे आयोजित क्रीडा शिक्षकांच्या २१ दिवसीय निवासी शिबीराच्या समारोपात ते बोलत होते.
क्रीडा शिक्षकांनी तंदुरूस्ती टिकवून ठेवण्यासह मुलांना विविध क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही हिरे यांनी केले. वैयक्तिक मार्गदर्शनातून क्रीडा शिक्षकाने एकतरी राष्ट्रीय खेळाडू घडविण्याची जिद्द बाळगली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस, अविनाश टिळे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, महात्मा गांधी विद्यामंदीरचे सहसचिव प्रा. व्ही. एस. मोरे आदी उपस्थित होते.
सबनीस यांनी क्रीडा विभागाच्या विविध योजना व उपक्रम यांची माहिती दिली. लवकरच क्रीडा शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे सांगितले. प्राचार्य बी. एस. जगदाळे यांनी विविध स्पर्धा, अभ्यासक्रमात क्रीडा विषयाला अधिकाधिक प्राधान्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी तळागाळातून कविता राऊतसारखे खेळाडू निर्माण करून क्रीडा शिक्षकांनी शाळेचा नावलौकीक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता व्यक्त केली.
शिबीरात ५० क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला. सुनील मोरे यांनी तंदुरूस्ती, गोकुळ घुगे योगा, गोरखनाथ बलकवडे कुस्ती, बजरंग परदेशी कबड्डी, शेखर घोष क्रिकेट, डॉ. महेंद्र महाजन सायकलिंग, डॉ. दिनेश कराड हॉकी, संतोष पवार हॅण्डबॉल, मेजर दिलीप शिंदे एनसीसी, डॉ. पटणी यांनी आहार, रोशनी गुजराथी सॉफ्टबॉम्ल, प्राचार्य हरिष आडके व्यक्तीमत्व विकास याप्रमाणे मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रा. विजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा शिक्षक मधुकर खैरनार यांनी आभार मानले.