केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर विविध महामंडळांसह विधान परिषद, नागपूर सुधार प्रन्यास आणि शहर अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. या नियुक्तयांसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी घेणार असले तरी दोन्ही नेत्यांचे समर्थक आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून ‘लॉबिंग’ करीत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार हे विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यामुळे विधान परिषदेच्या तीन जागांसाठी पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. भाजपकडे असलेल्या दोन जागापैकी एका जागेवर भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांचे नाव आघाडीवर आहे. गडकरी यांचे खंदे समर्थक असलेले व्यास यांनी मध्य नागपुरातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नसल्यामुळे ते नाराज झाले होते. २००९ विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गडकरी यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे त्यांनी निर्णय बदलला. व्यास यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठी नितीन गडकरी आग्रही आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक संदीप जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत पश्चिम नागपूरसाठी ते उत्सुक होते. मात्र, सुधाकरराव देशमुख यांच्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. शहर अध्यक्ष असलेले कृष्णा खोपडे यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे त्यांच्या जागी नव्या शहर अध्यक्षांची निवड केली जाणार असून त्यासाठी मोहन मते, संजय भेंडे, प्रभाकर येवले आणि सुधाकर कोहळे यांची नावे समोर आली आहेत. माजी आमदार असलेले मते यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीस आणि गडकरी या दोघांना चालणारे मते यांचे नाव सध्या आघाडीवर असले तरी संघ वर्तुळातून मात्र मात्र संजय भेंडे यांचे नाव समोर आले आहे.
नागपूर सुधार प्रन्यासाबाबत किमान वर्षभर त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून प्रन्यासवर तीन सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष निवडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या राजकारणामुळे जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लागल्यानंतर नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदी वर्णी लावण्यासाठी दोन्ही नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. मुन्ना यादव, सुनील अग्रवाल, रमेश सिंगारे, गिरीश देशमुख यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. आमदारांमधून डॉ. मिलिंद माने किंवा सुधाकरराव देशमुख यांच्यामध्ये स्पर्धा आहे. सुधाकरराव देशमुख हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत. डॉ. माने नितीन गडकरी समर्थक असल्यामुळे यापैकी दोनपैकी कोणा एकाची त्या ठिकाणी वर्णी लागण्याची शक्यता आहे.