लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले वर्षभर राष्ट्रवादीमध्ये स्पर्धा सुरू असतानाच आता निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षातही या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांची संख्या वाढल्यामुळेच उमेदवारांच्या पहिल्या यादीत नगरचा समावेश होऊ शकला नाही, असे सांगण्यात येते. दरम्यान, इच्छुकांची संख्या लक्षात घेऊनच नगरच्या उमेदवारीसाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे व पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते.
लोकसभेची नगर मतदारसंघात भाजपचाच खासदार आहे. मधला एक अपवाद वगळता दिलीप गांधी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून खासदार झाले. पहिल्याचे वेळी त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदाचीही संधी मिळाली. मात्र उमेदवारीसाठी त्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. आताही पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी उमेदवारीसाठी जोरदार दावा केला आहे. वरिष्ठ पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. त्यांच्याशिवाय आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचीही नावे चर्चेत आहेत. लोकसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षासमोरील अडचणीही वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पक्षाच्या राज्यातील पहिल्या यादीत खासदार यांचा समावेश होऊ शकलेला नाही. त्यांच्यासह दोन विद्यमान खासदार या यादीत नाहीत. ज्या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढली आहे त्या ठिकाणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवून इच्छुकांची चाचपणी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. नगरची जबाबदारी तावडे व फडके यांच्यावर सोपवण्यात आल्याचे समजते. लवकरच ते नगरला येऊन इच्छुकांची चाचपणी करतील असे समजते. स्थानिक पातळीवर मात्र त्याला दुजोरा मिळू शकला नाही.
नगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा दुरंगीच करण्याचा चंग राष्ट्रवादीने बांधल्याचे सांगण्यात येते. मागच्या पंधरा वर्षांत तीन निवडणुकांमध्ये ज्या वेळी दुरंगी लढत झाली त्या वेळी (सन २००४) येथे राष्ट्रवादीने झेंडा लावला, मात्र दोनदा तिरंगी लढत झाल्याने दोन्ही वेळेस भाजपला म्हणजे गांधी यांनाच येथे यश मिळाले. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन राष्ट्रवादीने निवडणूक दुरंगी करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार राजीव राजळे यांचे नाव त्यादृष्टीने आघाडीवर असल्याचे सांगण्यात येते.
मात्र राष्ट्रवादीतील या हालचाली लक्षात घेऊनच भाजपनेही सावध पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे. लोकसभेची निवडणूक खरंचच दुरंगी झाली तर काय करावे लागेल, याचे चिंतन वरिष्ठ पातळीवर सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून तावडे व फडके यांच्यावर इच्छुकांच्या चाचपणीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.