14 December 2017

News Flash

मार्गशीर्षांत कोटय़वधींची उलाढाल

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी करण्यात येणारे ‘महालक्ष्मी व्रत’ आजच्या गुरुवारपासून सुरू होत आहे. घरामध्ये

प्रतिनिधी | Updated: December 20, 2012 2:47 AM

मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी करण्यात येणारे ‘महालक्ष्मी व्रत’ आजच्या गुरुवारपासून सुरू होत आहे. घरामध्ये सुख, समृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. गेल्या काही वर्षांत मार्गशीर्ष महिन्यातील या व्रताचे माहात्म्य खूप मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. या व्रतासाठी लागणाऱ्या ‘महालक्ष्मी व्रत’ या पुस्तकाची / पोथीची अक्षरश: लाखोंच्या संख्येत विक्री होते. या पुस्तकाबरोबरच फळे, फुले आदींच्या विक्री व्यवसायात कोटय़वधींची उलाढाल होते.
मार्गशीर्षांच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करून सात सुवासिनींना या पुस्तकाच्या प्रती द्यायच्या असतात. गेल्या काही वर्षांत हे व्रत करणाऱ्या महिलांची संख्या काही लाखांच्या घरात गेली आहे. मार्गशीर्षांत गुरुवारच्या आदल्या दिवशी रेल्वे स्थानक परिसर, पदपथ यावर मोठय़ा प्रमाणात फळे, फुले, आंब्याचे टहाळे यांची विक्री होते. पुस्तक विक्रेत्यांकडेही ‘महालक्ष्मी व्रत’ पुस्तकाला मोठय़ा प्रमाणात मागणी येते.

हे पुस्तक प्रकाशित करणारे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच प्रकाशक आहेत. यात मुंबईतील ‘जयहिंद प्रकाशन’ हे एक नावाजलेले नाव आहे. जयहिंदचे हेमंत रायकर यांनी सांगितले की, पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आमच्या प्रकाशनेतर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाची किंमत अवघी दोन रुपये आहे. आम्ही मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेतही हे पुस्तक प्रकाशित करतो. गेल्या वर्षी कन्नड भाषेतही हे पुस्तक प्रकाशित केले होते. यंदा आमच्या पुस्तकाच्या ४० लाख प्रतींची विक्री झाली आहे. पुढील वर्षी आम्ही १ कोटी प्रतींची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आमचे पुस्तक मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात लहान-मोठय़ा शहरांमध्ये विकत घेतले जाते. यंदा फक्त मुंबईत या पुस्तकाच्या २० लाख प्रतींची विक्री झाली आहे. या पुस्तक विक्रीच्या व्यवसायातील ६५ ते ७० टक्के वाटा आमचा असल्याचेही रायकर म्हणाले.
‘महालक्ष्मी व्रत’ या पुस्तकाच्या विक्रीची उलाढाल ही केवळ या एक महिन्यातीलच आहे. लहान-मोठय़ा पुस्तक विक्रेत्यांबरोबरच मोठे व्यापारीही ही पुस्तके खरेदी करतात. ५५ ते ६५ रुपये शेकडा या दरानुसार ही पुस्तके व्यापारी विकत घेतात. संपूर्ण राज्याचा विचार केला तर ५० ते ७५ लाख इतक्या प्रमाणात या पुस्तकांची विक्री होत असल्याची माहिती एका मोठय़ा पुस्तक विक्रेत्या व्यावसायिकाकडून देण्यात  आली.

First Published on December 20, 2012 2:47 am

Web Title: turnover of carors in margashirsh
टॅग Margashish,Market