छोटय़ा पडद्यावरच्या मालिकांना ‘सासू-सुनेचे दळण’ म्हणून हिणवले जाते. आजही हे दळणवळण जुन्यावरून पुढे सुरू आहे हे खरे असले तरी बदलत्या काळानुसार सासू आणि सुनेच्या बदलत्या चेहऱ्यामोहऱ्यांचे प्रतिबिंब या मालिकांमध्ये उमटू लागले आहे. शिक्षण, त्यातून आलेले आर्थिक स्वातंत्र्य, आवडीचा व्यवसाय निवडण्याची संधी, यातून आलेला आत्मविश्वास आणि त्यातून पक्की झालेली वैचारिक बैठक ही आजच्या स्त्रीची प्रतिमा मालिकांमधून उमटू लागली आहे. हिंदीपेक्षा मराठी वाहिन्यांनी यात पुढाकार घेतला आहे. नवीन मालिकांच्या नायिका या एकूणच भरजरी साडय़ा आणि कटकारस्थाने आदी मागे टाकून वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी करताना दिसू लागल्या आहेत.
मध्यंतरी, ‘स्टार प्लस’वरील लोकप्रिय मालिका ‘दीया और बाती हम’च्या संध्याने पोलीसदलात जायचा निर्णय घेतला तेव्हा त्याची माध्यमांमध्ये कोण चर्चा झाली. अजूनही हिंदी मालिका सासू-सुनांमधून बाहेर येत नसताना अगदी पारंपरिक राजस्थानी कुटुंबातील, डोक्यावर घुंघट घेऊन वावरणारी नायिका लग्नानंतर पतीच्या पाठिंब्यावर आपले शिक्षण पूर्ण करते आणि पोलीस सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेते, हे आजवरच्या मालिकांच्या इतिहासालाच धक्का देणारे ठरले आहे. पण, याच पाश्र्वभूमीवर मराठी वाहिन्यांवरच्या मालिका आणि त्यांच्या नायिका यांच्यात मात्र फारच मोठा बदल घडून आलेला दिसतो आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मालिकांमधील प्रत्येक नायिका उपजीविकेसाठी काम करताना दिसते आणि तिच्या कामातही वैविध्य आले आहे. अगदी झी मराठीवरच्या ‘होणार सून मी या घरची’मधली आईआजी ही गोखले गृहउद्योगाची मालकीण आहे. पतीच्या निधनानंतर तिने छोटे छोटे पदार्थ बनवून ते विकण्यापासून सुरुवात केली आणि तिने उभारलेला ‘गोखले गृहउद्योग’ आता तिचा नातू सांभाळतो आहे. पण, तेही आजीच्या तत्वांनुसार. आईआजींची नातसून जान्हवी ही एवढय़ा मोठय़ा घराची सून आहे पण, आपल्या आईवडिलांची आर्थिक जबाबदारी उचलण्यासाठी ती लग्नानंतरही बँकेत काम करते आहे.
साधी नोकरी करणाऱ्या नायिकेपासून ते गुप्तहेरगिरी हा व्यवसाय म्हणून स्वीकारणाऱ्या अस्मितापर्यंत अनेकविध क्षेत्रात या नायिकांचा संचार वाढला आहे. एवढेच नाही तर सासू आणि सुना दोघीही नोकरी सांभाळून घर चालवताना दिसतात. ई टीव्ही मराठीवरच्या ‘१७६० सासूबाई’ या मालिकेतील सासूबाई म्हणजेच निर्मिती सावंत यांचा संबंध १७६० भानगडींशी नाही तर त्यांच्या खाकी वर्दीवरच्या बॅचशी आहे. या मालिकेत सासू आणि सून मानसी कुलकर्णी दोघीही पोलिस कॉन्स्टेबल आहेत आणि गंमत म्हणजे कार्यालयात सासूबाई सुनेच्या हाताखाली काम करत आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या नव्याकोऱ्या ‘लगोरी’तील मैत्रिणींनी महाविद्यालयात शिकत असतानाच इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी सुरू केली आहे. ‘राधा ही बावरी’ची राधा डॉक्टर होती, ‘तू तिथे मी’च्या मंजिरीनेही इंटेरिअर डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला आहे. तर ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ची ईशा वकिली करते आहे. पण, केवळ त्यांचे व्यवसायच बदलले आहेत असे नाही तर त्यांचे म्हणणे ठाम मांडतानाही त्या दिसू लागल्या आहेत.
आईआजींचेच उदाहरण घ्यायचे झाले तर त्या तत्ववादी आहेत. आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांना मान्य नाही. पण, एवढय़ा कठोर सासूबाई आपल्या नातसूनेकडून काळाची गरज म्हणून संगणक शिकून घेण्यात कमीपणा मानत नाही. सोनीवरच्या ‘एक नई पहचान’मधली सासूही सुनेच्या मदतीने ग म भ न गिरवायला शिकते आहे. ‘सुंदर माझे घर’च्या शिवानीची एकट अट आहे ती म्हणजे लग्नानंतर तिच्या आजीचा सांभाळ तिच्या नवऱ्याच्या घरी व्हायला हवा आहे. तर लग्नानंतर आपले शिक्षण पूर्ण करू द्या, असे घरच्यांना सांगायला मेघनाही कचरत नाही.
आजच्या नायिकांना वास्तवाचे भान आहे – अश्विनी यार्दी
काही वर्षांपूर्वी ‘कलर्स’सारख्या नव्या वाहिनीची सूत्रे प्रोग्रॅमिंग हेड म्हणून हातात घेताना अश्विनी यार्दी यांनी बालविवाहासारखे विषय मालिकांमधून मांडायचा निर्णय घेतला होता. मात्र, आजच्या मालिका आणि त्यातल्या स्त्रियांचे एकंदरीत भावविश्व पाहताना आजच्या नायिका या वास्तवातल्या आहेत, असे मत अश्विनी यार्दी यांनी व्यक्त केले. सध्या मालिकांमधून स्त्रियांच्या व्यक्तिरेखांचे पैलू व्यापकतेने मांडले जाऊ लागले आहेत. एकाचवेळी आजची नायिका पारंपरिक विचारांशी जुळवून घेणारी असते पण, आधुनिक बदलांचाही ती गांभीर्याने विचार करते. हा बदल सहजासहजी पचनी पडणारा नाही कदाचित, पण, एकाचवेळी स्त्रियांची ही एवढी रूपे आहेत हे आपण मान्य केले आहे. माझ्या मते स्त्रियांचे चित्रण या मालिकांमधून कसे केले गेले आहे हे महत्त्वाचे नाही, तर त्यांचे पैलू, त्यांच्या भावभावना, विचार आपण कसे आणि किती समजावून घेतले आहे हे यातून अधोरेखित होते आहे.