जेएनपीटी ते पामबीच मार्ग तसेच जेएनपीटी ते पळस्पे दरम्यानच्या रस्त्यात दररोज वाहतुक कोंडीमुळे या मार्गावरील प्रवासी त्रस्त आहेत. मात्र या मार्गावरून ट्रेलर्स व ट्रक चालविणाऱ्या चालकांना पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वीस रस्त्यावरच काढावे लागत आहे. कंळबोली तसेच जेएनपीटी ते गव्हाण फाटा दरम्यानच्या पंधरा ते वीस किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागू लागल्या आहेत. जेएनपीटी ते पळस्पे फाटा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब तसेच जेएनपीटी ते पामबीच मार्ग क्रमांक ५४ राज्य महामार्ग असे दोन्ही राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मोठय़ाप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहेत. जेएनपीटी बंदर व बंदरावर आधारीत उद्योगामुळे या परिसरातून दररोज हजारो अवजड वाहने तसेच हलकी व प्रवासी वाहने ये जा करीत आहेत. जेएनपीटी बंदरात ये-जा करणाऱ्या वाहनांना बंदरात संथ गतीने प्रवेश मिळत असल्याने करळ ते पागोटे पुला दरम्यान दररोज अवजड वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात परिणामी या मार्गावरून उरण-पनवेल मार्गावरील प्रवासी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.या वाहतुक कोंडीचा त्रास स्थानिक प्रवाशांना होत आहे. मात्र याचा सर्वाधिक त्रास अवजड कंटेनर वाहन चालकांना होऊ लागला आहे. बंदरातून माल ने -आण करण्यासाठी येणाऱ्या या अवजड वाहनांना या वाहतुक कोंडीत वीस-वीस तास रस्त्यावरच काढावे लागत आहेत. रस्त्यातील वाहतुक केंडीमुळे अन्न, पाणी या विनाच रस्त्यात रहावे लागत आहे. वाहतुक पुढे जात नसल्याने वाहन मालकांकडूनही बोलणी ऐकावी लागत आहेत. त्याचाही ताण सहन करावा लागत आहे. वाहनचालकांच्या या ताणामुळे त्यांच्या शरीरावरही परिमाण होऊन वाहन चालाकांना अनेकांना आजारांना सामोरे जावे लागत
आहे.