News Flash

आंध्रच्या दोन नक्षलवादी नेत्यांना नागपुरात ठार करण्यात आले होते

आंध्रच्या दोन नक्षलवादी नेत्यांना नागपुरात ठार करण्यात आले होते अग्निवेश यांच्याकडून आरोपांचा पुनरुच्चारखास प्रतिनिधी, नागपूर आंध्र प्रदेशात तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी नेता आझाद व पत्रकार हेमचंद्र पांडे यांच्या

| July 2, 2013 08:24 am

अग्निवेश यांच्याकडून आरोपांचा पुनरुच्चारखास
आंध्र प्रदेशात तीन वर्षांपूर्वी नक्षलवादी नेता आझाद व पत्रकार हेमचंद्र पांडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली चकमक खोटी असून त्या दोघांना तेथील पोलिसांनी नागपुरात ठार केल्याचा आरोप करीत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार स्वामी अग्निवेश यांनी सोमवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत केला. या घटनेला आज तीन वर्षे पूर्ण झाली.
छत्तीसगडमधील दंतेवाडाजवळ नक्षलवाद्यांनी ६ एप्रिल २०१० रोजी केलेल्या भूसुरुंग स्फोटात ७६ सुरक्षा जवान शहीद झाले. या घटनेचा निषेध करीत  ‘गोली नही बोली’ हेच यावर उत्तर असून नक्षलवाद्यांसोबत संवाद साधला पाहिजे, असा आग्रह धरला. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे एक पत्र आले. नक्षलवाद्यांनी आधी शस्त्रे खाली ठेवावीत. ७२ तासात त्यांनी हिंसाचार केला नाही तर सुरक्षा दले परत जातील, अशी सरकारची बाजू असल्याचा उल्लेख त्यात होता. हे पत्र ‘गोपनीय’ असून पत्राची वाच्चता करू नका, असे म्हटले होते. त्यामुळे पत्राची बाब गोपनीय ठेवली, असे अग्निवेश यांनी सांगितले.
एका प्रसार वाहिनीवर १७ मे २०१० रोजी रात्री सुरू असलेल्या कार्यक्रमात चिदंबरम यांनी ही बाब उघड केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्याजवळ याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘तुम्हीही पत्र मिळाल्याचे उघड करून टाका’ असे म्हणत त्यांनी ही बाब सहजतेने घेतली. नक्षलवाद्यांकडून चर्चेचा दिवस ठरवून घ्या, असे ते म्हणाल्याने सीपीआय (एम)च्या पॉलिट ब्युरोच्या मध्यवर्ती समितीचा प्रवक्ता आझाद याला चर्चेची वेळ मागितली. १०, १५ अथवा २० जुलै २०१० हे तीन दिवस २६ जून २०१० रोजी पत्रातून सूचविले आणि तसे चिदंबरम यांनाही कळविले. मात्र, १ जुलै २०१० रोजी आझाद व पांडे या दोघांचा चकमकीत मृत्यू झाला. चिदंबरम यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांनी चौकशीचे आश्वासन देत ४-५ दिवस थांबण्याची सूचना केली. त्यानंतर २२ जुलै २०१० रोजी श्रीकांत उर्फ सूकांत या सीपीआय (एम) मध्यवर्ती समिती सदस्याचे पत्र आले. सरकार तुमचा वापर करीत असून त्याआड आझादला मारल्याचे सांगत त्याने मला सावध रहाण्यास सांगितले. यामुळे धक्का बसला. सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप अग्निवेश यांनी केला. चर्चा झाली असती तर एवढा नरसंहार झालाच नसता. सीबीआय चौकशीत अनेक तृटी असल्याचे अग्निवेश यांनी सांगितले.
नवी दिल्लीहून रेल्वेने नागपूरला आझाद व पांडे निघाले. १ जुलै २०१० रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूरहून पांडे यांने त्याच्या अधिकाऱ्याला मोबाईलवरून सुटी वाढविण्यासंबंधी एसएमएस पाठविला होता. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला. हे दोघे सीताबर्डीवर बाजारात असताना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना पकडले. गुंगीचे औषध पाजून त्यांना बेशुद्ध केले. काळ्या काचेच्या वाहनातून नेले. त्यांचा नागपुरातच खून करून मृतदेह करीमनगरजवळ नेऊन टाकला,  असे एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानेच त्याच्या ब्लॉगमध्ये नमूद केले असल्याचे अग्निवेश म्हणाले. नक्षलवाद्यांशी आपला कुठलाही संबंध नाही. हिंसेचा विरोधात आहे. इशरतजहाँ चकमकही खोटीच आहे. या रहस्यमय प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

मानवाने निसर्गाचे शोषण केल्यानेच उत्तराखंड महाप्रलय झाला, असे मत अग्निवेश यांनी व्यक्त केले. उत्तराखंडमधील वारेमाप वीज प्रकल्पांना केंद्रीय मंत्री जयंती नटराजन यांनी स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्री बहुगुणा यांनी हरकत घेत विकासाचा मुद्दा लावून धरला. कंत्राटदार लॉबी, हॉटेल मफिया, लिकर माफिया, पॉवर माफिया यांनी पर्वत फोडून इमारती उभारल्या. आधीचे भाजप तसेच आताचे काँग्रेस सरकारही त्यास जबाबदार आहेत. निसर्गाचे शोषण केल्याने महाप्रलय घडला. अमरनाथ यात्रेचेही तसेच आहे. धार्मिक अंधविश्वास वाढवून नागरिकांना लुबाडले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. याविरोधात सार्वदेशिक आर्य समाज वैचारिक आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 8:24 am

Web Title: two andrapradesh leaders get shootout in nagpur by naxalite
टॅग : Loksatta,Nagpur News
Next Stories
1 स्टार बसवर जाहिरातींचा प्रस्ताव; महापालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत
2 एअर मार्शल कनकराज अनुरक्षण कमांडचे प्रमुख
3 मध्यस्थी जागृती कार्यक्रमात हजारो प्रकरणांचा निपटारा
Just Now!
X