तालुक्यातील क ऱ्हाळे डिग्रस शिवारात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या काळविटाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून बंदूक, ६ सुऱ्या, छरे असे साहित्य जप्त केले. दरम्यान, वन विभागाच्या कारवाईचा गाजावाजा झाला. परंतु दोन्ही आरोपी जडीबुटीवाले निघाले. त्यांची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका झाली. त्यामुळे ही कारवाई म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुहा’ अशीच असल्याची चर्चा होत आहे.
क ऱ्हाळे डिग्रस शिवारात गेल्या आठवडय़ात (१२ डिसेंबर) जखमी अवस्थेतील काळविटाला गावक ऱ्यांनी हिंगोलीच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करून काळविटाची जबाबदारी वन विभागावर सोपविली. उपचारादरम्यान या काळविटाचा मृत्यू झाला. दरम्यान, अज्ञात शिकारी आरोपींवर गुन्हा दाखल झाला. रीतसर पंचनामा करून काळविटाला जाळून टाकले. दुसऱ्या दिवशी बोरजा शिवारातून गंगासिंग व बाबुसिंग या पिता-पुत्रास अधिकाऱ्यांनी अटक केली. न्यायालयाने या दोघांची १५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. मात्र, अटक केलेले आरोपी जडीबुटीची औषधे विकून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे मिळालेल्या भरमार बंदुकीचा परवाना आहे.