शिकाऱ्यांच्या तावडीतून कोणतेही वन्यप्राणी आणि पक्षी सुटत नसून अमरावती जिल्ह्यातील चिरोडीच्या जंगलात मोराची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे उन्हाळयात याच जंगलात पाण्यात विष कालवून नऊ मोरांची शिकार करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी आरोपींना अटक करण्यात वनखात्याला अपयश आले होते.
अमरावतीपासून १७, १८ किलोमीटर अंतरावर असलेले चिरोडीचे जंगल राखीव जंगल आहे. या जंगलात विविध प्रकारचे पक्षी, प्राण्यांचा अधिवास आहे. मात्र, हे जंगल कायम शिकाऱ्यांसाठी मेजवानी ठरले आहे. त्यामुळे या जंगलातील वन्यप्राणी, पक्ष्यांची संख्या पाहता या जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या २२-२३ वषार्ंपासून वन्यजीव प्रेमी करीत आहेत. वन्यजीवप्रेमींच्या या मागणीला वनखात्याकडूनच दुर्लक्षित करण्यात आले. शिकाऱ्यांनी याचाच फायदा घेतला. गेल्या उन्हाळयात या जंगलातील पाणवठय़ांमध्ये विष कालवण्यात आले. हे पाणी पिण्यासाठी आलेल्या नऊ मोरांचा जागीच मृत्यू झाला. ही बाब तातडीने वनखात्यातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, पण वनखात्याला आरोपी गवसले नाही. आता याच जंगलात मोराची शिकार करण्यात आल्याचे गुरुवारी लक्षात येताच वनखात्याने तातडीने सूत्रे हलवली. या प्रकरणातील मुख्य आरोपी पुरण राठोड यांच्यासह अशोक जाधव याला अटक करण्यात वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना यश आले. आरोपींना आज चांदूर रेल्वे येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे पुरण राठोड हा सराईत गुन्हेगार असून बिबटय़ाच्या शिकार प्रकरणातील आरोपी आहे. भारतीय वन अधिनियम १९२७, वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.