स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी उद्यापासून दोन मोठी आंदोलने विदर्भात सुरू केली जाणार आहेत. विदर्भ संयुक्त कृती समितीच्यावतीने येत्या शनिवारी विदर्भभर नागपूर कराराची होळी आणि संयुक्त महाराष्ट्रातून विदर्भ राज्य वेगळे झाल्याची घोषणा केली जाणार आहे. यानिमित्ताने डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्त्वात वेगळा विदर्भ राज्य संघर्ष पदयात्रेचाही प्रारंभ होणार असल्याने स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात हवा भरण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. तेलंगणा निर्मितीच्या पाश्र्वभूमीवर स्वतंत्र विदर्भासाठी नागपूरचे खासदार विलास मुत्तेमवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. परंतु, आशिष देशमुख यांनी नवतरुणांचे नेतृत्त्व हाती घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी संघर्ष पदयात्रेची नवी खेळी खेळली आहे.
विदर्भवादी संघटनांच्यावतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शनिवारी नागपूर कराराची होळी करण्यात आल्यानंतर शहरातील शहीद चौकातून पदयात्रा प्रारंभ होईल. २९ सप्टेंबरला पदयात्रा दीक्षाभूमी, हिंगणा व कवडस येथे पोहोचणार असून त्यानंतर ३० सप्टेंबरला बोरधरण येथे शेतकरी, युवक, विद्यार्थी व कामगारांशी संवाद साधण्यात येईल. १ ऑक्टोबरला बोरधरण ते पवनारदरम्यान नागरिकांशी संवाद साधला जाईल, २ ऑक्टोबरला पदयात्रा सेवाग्रामला पोहोचणार आहे. या टप्प्यात सामाजिक कार्यकर्ते, लेखक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून पदयात्रेचा समारोप होणार आहे.
चंद्रपूर, गडचिरोलीत नक्षलवाद तर वऱ्हाडात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आमचे वर्तमान आहे. या समस्या सोडविण्यात शासनकर्त्यांना स्वारस्य नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, मजुरांना काम नाही, युवकांना रोजगार नाही, उद्योगांना सवलती नाहीत, अशी स्थिती असल्याने महाराष्ट्रात राहून विदर्भाचे भले होऊ शकत नाही, अशी भूमिका आशिष देशमुख यांनी घेतली आहे.