शहरातील वेगवेगळ्या भागातून दोन मुलांचे अपहरण झाल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उंटवाडी रस्त्यावरील बाल निरीक्षण गृहातून बारा वर्षीय मुलास तर नाशिकरोड येथे घडलेल्या घटनेत १३ वर्षीय बालकाला कोणीतरी पळवून नेले.
गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचे दिसत आहे. चोरी, घरफोडी, पोलीस असल्याची बतावणी करून लूट, वाहने लंपास करणे, महिलांच्या अंगावरील दागिने खेचून नेणे हे प्रकार दिवसागणीक घडत आहे. त्यात आता बालके गायब झाल्याच्या घटनांची भर पडली आहे. पहिली घटना उंटवाडी रस्त्यावरील बाल निरीक्षण गृहात घडली. मुलांच्या बाल निरीक्षण गृहातून कोणाचे लक्ष नसताना संतोष किसन अकलु (१२) यास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. या प्रकरणी निरीक्षण गृहाचे निरीक्षक नानाजी जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना नाशिकरोडच्या पंजाबी कॉलनीत घडली. निर्मला निवास येथे वास्तव्यास असलेला अभिषेक मिश्रा (१३) मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर गेला होता. तो घरी परतलाच नाही. कोणीतरी त्यास फूस लावून पळवून नेले असल्याची तक्रार त्याचा भाऊ आशिषकुमार मिश्रा यांनी दिली. या तक्रारीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पाठोपाठ एक दोन अल्पवयीन मुले गायब झाल्याच्या घटना घडल्याने वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहे. एखादा अल्पवयीन मुलगा हरविल्यास आता न्यायालयाच्या निर्देशामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यानुसार पोलीस यंत्रणेने ही प्रक्रिया केली असली तरी अपहृत बालकांचा शोध व या घटनेची कारणिममासा होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.