सटाणा तालुक्यातील खैराळपाडा येथे पाझर तलावात दोघांचा बुडून झालेला मृत्यू ही दुर्घटना नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.  
सटाणा तालुक्यातील खैराळपाडा या ठिकाणी पाझर तलावात बुडून अशोक अहिरे (३०) आणि पोपट पवार (३१) यांचा बुडून मृत्यू झाला होता. हे दोन्ही युवक तलावात मासे पकडण्याचे काम करतात. जाळ्यात अडकून खोल पाण्यात ते बुडाले होते. प्रारंभी ही दुर्घटना असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. तथापि, तपासात ही घटना घातपाताचा प्रकार असल्याचे उघड झाले. पाझर तलावात चार युवकांचे टोळके आले होते. त्यांनी तलावातून मासे काढण्याचा प्रयत्न केला. अशोक व पोपटने त्यास हरकत घेतल्यावर ते संतापले. त्यातच संशयितांनी दोघांना मासे पकडण्याचे जाळे पायाला बांधून तलावात टाकले. प्राथमिक
तपासात या बाबी उघड झाल्यावर पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.