पैशासाठी मित्राचा खून केल्याच्या आरोपावरून दाखल केलेल्या खटल्यातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सत्र न्यायाधीश बी. व्ही. देबडवार यांनी बुधवारी हा निकाल दिला.
शहरातील पाइपलाइन रस्त्यावरील किरण सुदाम भिंगारदिवे (वय ३०) याच्या खुनाच्या आरोपावरून त्याचे मित्र रोहन ऊर्फ सनी उदय हजारे (वय २८, राहणार नवी सांगवी, पुणे) व दादा ऊर्फ महेंद्र शिवाजी जगताप (२७, कोळगाव, ता. श्रीगोंदे) या दोघांना ही शिक्षा देण्यात आली.
किरण याचा भाऊ कुलदीप याने दि. १० ऑक्टोबर १०ला भाऊ बेपत्ता झाल्याची तक्रार नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती. याच दरम्यान श्रीगोंदे पोलिसांना बेलवंडी येथे अज्ञात इसमाचा मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह किरण याचा असल्याचे निष्पन्न झाले. पुढे तपासात वरील दोन मित्रांनीच किरण याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचे आढळून आले. दोन्ही आरोपी पुणे रस्त्यावरील महेंद्र धाब्यावर व्यवस्थापक व वेटर म्हणून कामाला होते. त्यांची किरणशी मैत्री होती. किरणने त्याची मोटारसायकल ५ हजार रुपयांना विकली होती. या पैशासाठी या दोघांनी किरण याचा खून केला होता. तपासात त्यांच्या कपडय़ावरही रक्ताचे डाग आढळून आले होते.
या खटल्यात एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या बाजूने सरकारी वकील गोरक्ष मुसळे व फिर्यादी कुलदीप भिंगारदिवे यांच्या वतीने वकील सतीश गुगळे यांनी काम पाहिले.