शहरात सामाजिक भान ठेवत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाचे पालन गोविंदा पथकांनी व आयोजकांनी दहीहंडी साजरी केली. उत्सवातील ध्वनिक्षेपणाच्या शोरवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याने त्यांचा जोर कमी असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.  मंडळांनी उत्सवाचा खर्च कमी करीत त्यामाध्यमातून सामाजिक कार्याला हातभार लावला. नियमांचे काटेकोर पालन करण्याची ताकीद पोलिसांनी दिल्याने मंडळांच्या उत्साहाचा जोर काही ठिकाणी ओसरल्याचे दिसून आले. कोणत्याही ठिकाणी नियमांचे उल्लघंन झाल्याची नोंद संध्याकाळपर्यंत नव्हती. महापालिका रुग्णालयात दोन गोंविदांवर किरकोळ उपचार करण्यात आले. तर एका गोविंदाला डोक्याला गंभीर दुखापत असल्याने अतिदक्षता विभागात दाखल करून घेण्यात आले होते.
परिमंडळ १ मध्ये ९१ तर परिमंडळ २ मध्ये १५८ ठिकाणी सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. सरावादरम्यान पडल्याने गंभीर जखमी होऊन सानपाडय़ामधील बालगोविंदा किरण तरेकीर याला प्राण गमावावे लागले. यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द केले होते. त्याच प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशानुसार पोलीस यंत्रणेने आयोजकांना उत्सव साजरा करताना करावयाच्या उपायोजनांची माहिती दिली होती. सार्वजनिक मंडळांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी डीजे वापरणे टाळले होते. मंडळाकडून आवाजाची मर्यादा पाळली जात असल्याने नागरिकांनी विशेषता ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दहीहंडी उभारताना अनेकांनी ती वीस फुटांपेक्षा अधिक उंच ठेवली नव्हती. पथकांकडून थर लावताना न्यायालयांच्या निर्देशाच्या संदर्भातील सूचना आयोजकांकडून देण्यात येत होत्या. कोपरखैरणे येथील वनवैभव कला क्रीडा निकेतनच्या वतीने दर वर्षी आयोजित करण्यात येणारी दहीहंडी रद्द करून मृत बालगोविंदा तरेकीरच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केले होते. त्याप्रमाणे मंडळाचे अध्यक्ष वैभव नाईक यांनी त्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मदतीचा धनादेश त्याच्या आईकडे सपूर्द केला. त्याच प्रमाणे पामबीच येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीनेदेखील दहीहंडी उत्सवाचे आयोजन रद्द करून पन्नास हजारांचा निधी जव्हार येथील मोखाडामधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात आला. यामध्ये १० विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलण्यात आला आहे. याच पद्धतीने अनेक मंडळांकडून खर्च कमी करत सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.